इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्यापूर्वी राजस्थान रॉयल्ससह इतर संघांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्सचे तीन मोठे खेळाडू बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध होणार नाहीत आणि यामुळे राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीवर खोल परिणाम होऊ शकतो. पण, राजस्थानच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, त्यांनी जोस बटलरच्या जागी संघात समाविष्ट केलेला फलंदाज अप्रतिम फॉर्ममध्ये आहे.
या खेळाडूने सीपीएल २०२१ मध्ये गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले आहे. हा खेळाडू दुसरा कुणी नसून सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स संघाचा फलंदाज तसेच वेस्टइंडिजचा ‘एव्हिन लुईस’ आहे. जोस बटलरच्या जागी राजस्थान रॉयल्सने त्यास संघात स्थान दिले आहे.
लुईस सीपीएल २०२१ मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. हा डावखुरा फलंदाज सध्या सीपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. लुईसने १० सामन्यांमध्ये ५२.५० च्या सरासरीने ४२० धावा केल्या आहेत, ज्यात शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
सर्वात मोठी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, लुईसने सीपीएल २०२१ मध्ये चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले आहेत. या फलंदाजाने आतापर्यंत ३८ षटकार आणि २४ चौकार ठोकले आहेत. लुईसचा स्ट्राइक रेट देखील १६० पेक्षा जास्त राहिला आहे. लुईसने मंगळवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात गयाना ऍमेझॉन वॉरियर्सविरुद्ध तुफानी फलंदाजी केली. १७९ धावांचा पाठलाग करणाऱ्या सेंट किट्सच्या संघाने केवळ ३ विकेट गमावून आणि १३ चेंडूत राखून लक्ष्य साध्य केले होते.
लुईस सेंट किट्सच्या विजयाचा नायक होता. या फलंदाजाने अवघ्या ३९ चेंडूत नाबाद ७७ धावा केल्या, ज्यामध्ये त्याने ८ षटकार मारले. या खेळी दरम्यान लुईसचा स्ट्राइक रेट १९७ पेक्षा जास्त होता.
आयपीएल २०२१ मध्येही लुईसचा हा फॉर्म कायम राहिल्यास राजस्थान रॉयल्सला मोठा दिलासा मिळणार आहे. राजस्थानचा संघ लुईसला सलामीवीर म्हणून खेळवू शकतो.
सध्या, राजस्थान रॉयल्स ७ सामन्यांत ३ विजयांसह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी ७ पैकी ५ सामने जिंकावे लागतील. अशा स्थितीत लुईसकडून खूप अपेक्षा असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: डिव्हिलियर्सची ‘३६० डिग्री’ फटकेबाजी; ४६ चेंडूत शतक करत वाढवलं प्रतिस्पर्ध्यांचं टेंशन
Video: स्मिथच्या घातक चेंडूने मोडली गेलची बॅट, ‘युनिवर्स बॉस’चेही जशास तसे उत्तर