माजी भारतीय कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने काल (०७ जुलै) आपला वाढदिवस साजरा केला. वयाच्या ४० व्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी आजी-माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या. धोनीचे जुने व्हिडिओ, त्याचे नेत्रदिपक फोटो, क्रिकेटच्या मैदानाचा केक कापणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने या खास दिनाला अजून खास बनवले. इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्स संघाचा धाकड फलंदाज रियान पराग यानेही शानदार आणि लक्षवेधी पद्धतीने माहीला शुभेच्छा दिल्या आहेत.
रियान सध्या आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामाची तयारी करण्यासाठी संघाच्या क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. अशात धोनीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने त्याच्या अविस्मरणीय षटकाराची चाहत्यांना पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे.
राजस्थान संघाचे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, २१ वर्षीय रियान धोनीप्रमाणे आपल्या हाताचे ग्लोव्हज वर ओढतो आणि चाणाक्षाने चेंडूकडे पाहात अगदी २०११ विश्वचषक अंतिम सामन्यातील धोनीच्या मॅच विनिंग षटकाराची पुनरावृत्ती करतो. धोनीने श्रीलंकेविरुद्ध हा शानदार फटका खेळत भारतीय संघाला २८ वर्षांनंतर विश्वविजेता बनवले होते. खास बाब अशी की, या व्हिडिओला रवी शास्त्रींच्या समालोचनाचा आवाज जोडण्यात आला आहे. यामुळे या व्हिडिओची शोभा अजूनच वाढली आहे.
https://www.instagram.com/reel/CRBvNqCnVEj/?utm_source=ig_web_button_share_sheet
धोनीचा वनडे विश्वचषक २०११ अंतिम सामन्यातील तो षटकार अनेकांसाठी अजूनही तितकाच खास आहे. नुकतेच माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही धोनीच्या षटकाराची स्तुती केली होती.
तो म्हणाला होता की, “माझ्यासाठी तो दिवस खूप मोठा होता, जेव्हा भारतीय संघाने २०११ चा वनडे विश्वचषक पटकावला होता. महान क्रिकेटपटू एमएस धोनीने शेवटच्या चेंडूवर अप्रतिम षटकार खेचत भारताला जेतेपद मिळवून दिले होते. तो क्षण खरच खूप अप्रतिम होता. हे क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच अविस्मरणीय राहणार आहेत.”
“मला अजूनही आठवण आहे की, मी त्या रात्री वानखेडेमध्ये उपस्थित होतो. जेव्हा धोनीने तो विजयी षटकार मारला, तेव्हा मी तो क्षण पाहण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समधून उठून बाहेर आलो होतो. संपूर्ण संघ मैदानाच्या चारी दिशांनी फिरत आनंदाचा जल्लोष साजरा करत होता. जेव्हा २००३ मध्ये मी संघाचा कर्णधार होतो, तेव्हा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या हातून आमचा पराभव झाला होता. त्यामुळे धोनीने चषक जिंकल्यानंतर मी खूप आनंदी झालो होतो,” असेही त्याने सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुलने सलामीला ५ शतके ठोकलीत, तरीही त्याला खाली खेळवण्याचा अट्टाहास का? दिग्गजाचा मोठा प्रश्न
इंग्लंडमध्ये भारतीय संघाला भोवते सलामीवीरांचे अपयश, ‘ही’ आहे २० वर्षातील सर्वात यशस्वी जोडी