सध्या इंडिया ए आणि न्यूझीलंड ए संघांमध्ये बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर चार दिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंडिया ए संघाच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. प्रथमच इंडिया ए साठी खेळत असलेल्या मध्य प्रदेशच्या रजत पाटीदार याने या वर्षातील आणखी एक चमकदार कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंड ए संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात 400 धावा उभारल्या होत्या. इंडिया ए संघाकडून सलामीवीर अभिमन्यू ईस्वरन याने शानदार शतकी खेळी केली. मात्र, भारताच्या पहिल्या डावातील वैशिष्ट्य म्हणजे इंडिया ए साठी पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदार याचे शतक. चौथ्या क्रमांकावर खेळायला उतरलेल्या रजतने दमदार कामगिरी करताना तिसऱ्या दिवसाखेर 241 चेंडूवर नाबाद 170 धावा केल्या. यामध्ये 14 चौकार व चार षटकारांचा समावेश आहे.
रजतसाठी 2022 हे वर्ष भलतेच लाभदायी ठरत आहे. रजतने यावर्षी रणजी हंगामात सातत्याने धावा केल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्याच्याच शतकाच्या बळावर मध्य प्रदेशने प्रथमच रणजी ट्रॉफी आपल्या नावे केली. रजत याला यावर्षीच्या आयपीएलमधून विशेष ओळख मिळाली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी बदली खेळाडू म्हणून आलेल्या रजतने थेट प्ले ऑफ्समध्ये झंझावाती शतक झळकावले होते. त्यानंतर आता इंडिया ए साठी देखील पदार्पणातच शतक करून त्याने संपूर्ण वर्षच आपल्या नावे केल्याचे दिसत आहे.
भारतीय संघाची या डावातील कामगिरी पाहायला गेल्यास ईस्वरनने 132 धावा केल्या. कर्णधार प्रियांक पांचालने 47 धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड व सर्फराज खान हे चांगल्या सुरुवातीचा लाभ घेऊ शकले नाहीत. मात्र, त्यानंतर रजत व तिलक वर्मा या दोन्ही पदार्पणवीरांनी भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही. तिसऱ्या दिवसाखेर रजत नाबाद 170 तर तिलक 82 धावांवर खेळत आहे. सध्या भारतीय संघाकडे 92 धावांची आघाडी असून, रविवारी सामन्याचा अखेरचा दिवस आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या पठ्ठ्याने न्यूझीलंडविरुद्ध झळकावले शानदार शतक! 400 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमदार सुरुवात
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे रवी चमकणार! प्लेइंग 11मध्ये होणार ‘हे’ बदल
विरुष्काचा फोटो वॉर्नरची कमेंट आणि ट्रोलिंग नंतरचं स्पष्टीकरण! वाचा काय आहे प्रकरण