पुणे| चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असून त्याला एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळणार आहे. चौथ्या पर्वातील ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत रंगणार आहे.
गतवर्षी नोव्हेंबरमध्ये बहरेन, मानामा येथील एटीपी स्पर्धेत रामकुमार याने विजेतेपद पटकावले होते आणि अव्वल 200 खेळाडूंच्या यादीत आपले स्थान निश्चित केले होते. 2017 मध्ये जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या डोमिनिक थीमचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. टाटा ग्रुप प्रायोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजित दक्षिण आशियातील एकमेव250 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी रामकुमार सहभागी होत आहे.
टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, मुख्य ड्रॉमध्ये भारतीय खेळाडूंना थेट प्रवेश देताना आणि स्पर्धेतील पहिले वाईल्ड कार्ड रामकुमारला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. रामकुमार याने नुकतीच लक्षवेधी कामगिरी केली आहे आणि स्पर्धेतील तो लोकप्रिय चेहरा आहे. भारतीय खेळाडूंचे प्रोत्साहन मिळावे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे ही आमची या स्पर्धेत प्रति कटिबद्धता आहे. या स्पर्धेच्या गेल्या काही मालिकेत आमच्या भारतीय खेळाडूंनी सुरेख कामगिरी बजावली आहे आणि यावर्षी देखील त्याची पुनरावृत्ती करतील.
27 वर्षीय चेन्नईचा रामकुमार हा या वाईल्ड कार्डद्वारे मुख्य ड्रॉमध्ये खेळणार असून युकी भांब्रिचा देखील समावेश त्यात आहे. आयएमजी यांच्या मालकीच्या आणि राईज वर्ल्डवाईड संचलित देशांतील सर्वात जुन्या क्रीडा क्षेत्रातील स्पर्धांपैकी एक असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत यावर्षी अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले असून यामुळे विजेतेपदासाठी अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या ऍस्लन कारास्तेव, लॉरेन्झो मुसेत्ती आणि गतवर्षीच्या मालिकेतील विजेता जेरी व्हेसली यांसारख्या अव्वल 100 खेळाडूंमधील सात खेळाडूंचा समावेश आहे.
यावेळी रामकुमार रामनाथन म्हणाला की, आयोजकांच्या वतीने वाईल्ड कार्डद्वारे थेट मला स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश दिल्याने मला खुप आनंद झाला आहे. तसेच यावर्षी अनेक मानांकित खेळाडूंचा समावेश असल्यामुळे कडवे आव्हान समोर असणार आहे. पण तरीही मी स्पर्धेत उत्तम खेळ करेल. गतवर्षी भारतात टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा आणि इतर स्पर्धा होऊ शकल्या नाहीत त्यामुळे आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे.गतवर्षी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा होऊ शकली नाही, परंतु यावर्षी पुन्हा ही स्पर्धा होत आहे याचा आम्हाला आनंद झाला आहे. तसेच, रामकुमारची कारकीर्द फार जवळून पाहिली आहे, वर्षभरात त्याने सर्वोत्तम खेळ केला आहे. याशिवाय डेव्हिस चषक स्पर्धेचा देखील तो एक भाग होता. त्याची मागील कामगिरी पाहून यावर्षी नक्कीच तो लक्षवेधी कामगिरी करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
तसेच, एकेरी गटाबरोबरच रामकुमार दुहेरीत रोहन बोपन्नाच्या साथीत मुख्य ड्रॉ मध्ये खेळणार आहे.