पुणे। मंगळवारी (१० मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ५७ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे पार पडला. हा सामना गुजरातने ६२ धावांनी जिंकला. गुजरातच्या या विजयात उपकर्णधार राशिद खानचा मोठा वाटा राहिला. त्याने ४ विकेट्स घेत एका खास विक्रमालाही गवसणी घातली आहे.
राशिदची भेदक गोलंदाजी
या सामन्यात लखनऊ संघ १४५ धावांचा पाठलाग करत असताना गुजरातकडून राशिद खानने (Rashid Khan) शानदार गोलंदाजी केली. त्याने ३.५ षटके गोलंदाजी करताना ६.३० च्या इकोनॉमी रेटने २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. त्याने दीपक हुडा, कृणाल पंड्या, जेसन होल्डर, अवेश खान यांच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे गुजरातला लखनऊ संघाला १४ षटकांच्या आतच ८२ धावांवर रोखण्यात यश आले.
राशिदचा मोठा विक्रम
राशिदने लखनऊविरुद्ध ४ विकेट्स घेत टी२० क्रिकेट कारकिर्दीत ४५० विकेट्स (450 t20 Wickets) पूर्ण केल्या. हा टप्पा पूर्ण करणारा तो जगातील केवळ तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी असा विक्रम केवळ ड्वेन ब्रावो आणि इम्रान ताहिर यांनी केला आहे.
सर्वाधिक टी२० विकेट्स (Most T20 Wickets) घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ५८७ विकेट्ससह ब्रावो अव्वल क्रमांकावर आहे. तसेच ४५१ विकेट्ससह इम्रान ताहिर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे टी२० क्रिकेटमध्ये ४५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये या तिघांचेच नाव सध्या येते. तसेच आता राशिदला इम्रान ताहिरला मागे टाकण्याचीही संधी आहे, त्याने आणखी २ विकेट्स घेतल्या तर तो इम्रान ताहिरला मागे टाकू शकतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या १५ जणांत एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही. भारताकडून सर्वाधिक टी२० विकेट्स आर अश्विनने घेतल्या असून तो १७ व्या क्रमांकावर आहे. त्याने २७३ टी२० विकेट्स घेतल्या आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
५८७ विकेट्स – ड्वेन ब्रावो
४५१ विकेट्स – इम्रान ताहिर
४५० विकेट्स – राशिद खान
४३७ विकेट्स – सुनील नारायण
४१६ विकेट्स – शाकिब अल हसन
गुजरातचा प्लेऑफमध्ये प्रवेश
गुजरातने लखनऊ विरुद्ध विजय मिळवताच आयपीएल २०२२ प्लेऑफमधील (IPL 2022) स्थान पक्के केले आहे. गुजरातने शुबमन गिलच्या ६३ धावांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात ४ बाद १४४ धावा केल्या होत्या. लखनऊकडून अवेश खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच लखनऊ संघ १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १३.५ षटकात ८२ धावांवर सर्वबाद झाला. लखनऊकडून दीपक हुडाने २७ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. गुजरातकडून राशिदने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022 | गुजरातने प्लेऑफ गाठले; अन्य ३ जागांसाठी कसे आहे समीकरण, घ्या जाणून
यंदाची आयपीएल ट्रॉफी गुजरात टायटन्सच घेऊन जाणार; विश्वास बसत नसेल, तर ही आकडेवारी पाहाच
लखनऊला ६२ धावांनी नमवत गुजरात पुन्हा ‘टेबल टॉपर’, बनला प्लेऑफमध्ये पोहोचणारा IPL 2022मधील पहिला संघ