मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील ४० व्या सामन्यात बुधवारी (२७ एप्रिल) गुजरात टायटन्सने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत सनरायझर्स हैदराबाद संघाला ५ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. गुजरातच्या हा या आयपीएल हंगामातील ८ सामन्यांमधील ७ वा विजय होता. गुजरातच्या या विजयात राशिद खान याने मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने एक मोठा विक्रमही केला आहे.
राशिदचा विजयी षटकार
या सामन्यात गुजरातला अखेरच्या षटकात २२ धावांची गरज होती. यावेळी पहिल्या दोन चेंडूंवर राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) एका षटकारासह ७ धावा काढल्या. त्यानंतर राशिद खानने (Rashid Khan) अखेरच्या ४ चेंडूत ३ षटकार खेचत गुजरातला विजय मिळवून दिला. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना राशिदने षटकार खेचला आणि गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
राशिदचा मोठा विक्रम
राशिद खानने २० व्या षटकात ३ षटकार खेचल्याने त्याने एक मोठा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करताना २० व्या षटकात ३ षटकार मारणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा विक्रमक केवळ अक्षर पटेल आणि एमएस धोनी यांनाच करता आला आहे. अक्षर पटेलने २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध असा पराक्रम केला होता, तर त्यापूर्वी एमएस धोनीने २०१६ साली पंजाब किंग्सविरुद्ध ३ षटकार ठोकले होते (Most Sixes in the 20th over of a successful IPL chase).
गुजरात टायटन्सने जिंकला सामना
बुधवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९५ धावा केल्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने ६५ धावांची आणि एडेन मार्करमने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातकडून वृद्धिमान साहाने ६८ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच शुबमन गिलने २२ धावांची खेळी केली. पण गुजरातची मधली फळी स्वस्तात कोलमडली. मात्र, अखेरच्या षटकात राहुल तेवतिया आणि राशिद खानने तुफानी फटकेबाजी कामगिरी करताना विजय मिळवला. गुजरातने २० षटकांत ५ विकेट्स गमावत १९९ धावा केल्या. हैदराबादकडून सर्व ५ विकेट्स उमरान मलिकने घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘रिषभ पंत बनू शकतो कसोटी कर्णधार’, भारतीय संघाला विश्वविजेता बनवणाऱ्या दिग्गज खेळाडूचे वक्तव्य
मूर्ती लहान, कीर्ती महान! आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात ‘अशी’ कामगिरी करणारा उमरान बनला दुसरा खेळाडू