काही दिवसांपूर्वीच आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ही स्पर्धा मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांच्यासाठी शेवटची स्पर्धा ठरली होती. रवी शास्त्री यांनी हे पद सोडल्यानंतर राहुल द्रविड यांना हे पद देण्यात आले आहे. दरम्यान मुख्य प्रशिक्षक पदाचा कालावधी संपल्यानंतर आता रवी शास्त्री यांनी विराट कोहलीबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
रवी शास्त्री यांनी २०१४ मध्ये संघ संचालकाचे पद स्वीकारले होते. त्यावेळी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यावर भारतीय संघाचा पराभव झाला होता. तसेच विराट कोहलीला देखील साजेशी कामगिरी करता आली नव्हती. विराट कोहलीने या दौऱ्यावरील ५ कसोटी सामन्यात १,८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० धावा केल्या होत्या. या निराशाजनक कामगिरीनंतर विराट कोहली पूर्णपणे खचून गेला होता.
रवी शास्त्री यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी पद सांभाळल्यानंतर अशा व्यक्तीच्या शोधात होतो, ज्याच्यासोबत मी संवाद साधू शकेल. कोहली धोनीसारखाच होता. मी त्याच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केली. मी त्याला खूप जवळून पाहू लागलो. त्याचा आत्मविश्वास मला दररोज परतताना दिसत होता.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “परिस्थिती समजून घेण्यासाठी आम्हाला २ ते ३ महिने लागले. आम्ही खूप बोलू लागलो. विविध मुद्द्यांवर, फलंदाजीचे तंत्र, पुढील प्लॅनिंग अशा अनेक गोष्टींवर चर्चा झाली. त्यानंतर विराट कोहलीने जोरदार पुनरागमन केले आणि २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने ८६.५० च्या सरासरीने ६९२ धावा केल्या ज्यात चार शतकांचा समावेश होता.”
“ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली फॉर्ममध्ये परतला होता.त्यावेळी तो आपल्या फलंदाजीमुळे आणि नेतृत्वामुळे चर्चेत आला होता. ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास देखील उंचावला होता. जे आम्हाला हवं होतं, त्याप्रकारे त्याने स्वतः ला सिद्ध केलं,” असे रवी शास्त्री म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय क्रिकेटचा युवराज घडवणारे ‘ड्रॅगन सिंग’
विराट कोहलीने पहिल्याच भेटीत अनुष्काला मारला होता टोमणा, स्वतःच केला मोठा खुलासा
भारी ना! कर्णधार म्हणून पदार्पणातच पॅट कमिन्सने मोडला ६३ वर्षांपूर्वीचा विक्रम