क्रिकेटमध्ये फलंदाजाला मंकडींग पद्धतीने बाद करणे नेहमीच विवादाचा विषय राहिले आहे. काही खेळाडू या पद्धतीला योग्य, तर काही खेळाडू अयोग्य मानतात. एमसीसीने काही दिवसांपूर्वी यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आणि खेळाडूला बाद करण्याची ही पद्धत योग्य असल्याचे सांगितले, त्याचबरोबर अशाप्रकारच्या विकेटलाही धावबादमध्येच गणले जाईल असेही स्पष्ट केले. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने यासंदर्भात स्वतःची मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकेटचे नियम बनवणारी आणि त्यामध्ये सुधार करणारी समिती मेरिलबोन क्रिकेट क्लबने (MCC) मंकडींगविषयी मार्च महिन्याच्या सुरुवातीला मोठा निर्णय घेतला. एमसीसीने मंकडींग ऐवजी धावबाद शब्दाचा प्रयोग योग्य सांगितला आहे आणि ही पद्धत योग्य असल्याचेही स्पष्ट केले आहे. मंकडींग म्हणजे गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधीच जर नॉनस्ट्रायकर फलंदाज क्रिजच्या बाहेर गेल्यावर स्टंपवरील बेल्स उडवले, तर तो बाद होतो.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि मंकडींग (Mankding) यांचा संबंध तसा जुनाच आहे. आयपीएल २०१९ च्या एका सामन्यात अश्विनने इंग्लंडच्या जॉस बटलरला या पद्धतीने बाद जेले होते आणि या नियमाशी संबंधीत वादाला नव्याने सुरुवात झाली होती. आता एमसीसीने घेतलेल्या निर्णयाचे अश्विनने स्वागत केले.
अश्विनच्या म्हणण्याप्रमाणे गोलंदाजांना आता त्या फलंदाजांना बाद करताना कसलाही संशय नसला पाहिजे, जे चेंडू हातातून सुडण्याआधीच क्रीजच्या बाहेर पडतात. अश्विनच्या मते अशा खेळाडूंना जर बाद केले नाही, तर ही गोलंदाजाच्या कारकिर्दीसाठी धोक्याची बाब ठरू शकते.
अश्विनने स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो मंकडींग विषयावर व्यक्त झाला आहे. व्हिडिओत तो म्हणाला, “माझे सहकारी गोलंदाज, कृपया समजून घ्या. नॉन स्ट्राइकवरील एक अधिकचे पाऊल तुमची पूर्ण खेळी संपवू शकते. कारण जर नॉन स्ट्राइकवरील फलंदाज स्ट्राइकवर आला, तर तो एक षटकार मारू शकतो आणि असे फक्त त्याच्या एका अधिकच्या पावलामुळे होऊ शकते. त्याच ठिकाणी स्ट्राइकवरील फलंदाज शक्यतो बाद होऊ शकला असता. जर तुम्ही एक विकेट घेतली, तर तुम्ही तुमच्या कारकिर्दीत पुढे जाल. मात्र, त्याच चेंडूवर जर षटकार गेला, तर तुमची कारकिर्दीत खालच्या दिशेने जाऊ शकते.”
“या गोष्टीचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे माझी इच्छा आहे की, गोलंदाजांच्या डोक्यात नॉन स्ट्राइकवरील फलंदाजाला धावबाद करण्याविषयी कसलीही शंका नसली पाहिजे. हा एक महत्वाचा निर्णय आहे,” असे अश्विन पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, माजी भारतीय दिग्गज विनू मंकड यांच्या नावावरून मंकडींग हे नाव अस्तित्वात आले होते. विनू मंकड यांचा मुलगा मागच्या अनेक वर्षांपासून खेळाडूंना बाद करण्याच्या या पद्धतीचे नाव बदलण्यासाठी प्रयत्न करत होता. याच विषयावर त्याने बीसीसीआय आणि आयसीसीला पत्र पाठवले होते. अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. आता मंकडींग ऐवजी धावबाद हा शब्द वापरला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या –