Loading...

पुणे कसोटी खेळण्याआधीच विराट कोहली झाला क्लिन बोल्ड!

पुणे। उद्यापासून(10 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे होणार आहे. या सामन्याआधी सराव करत असताना विराट कोहलीला त्याचाच संघसहकारी रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केले आहे.

फिरकीपटू जडेजाने सरावादरम्यान विराटला त्रिफळाचीत करण्याचा व्हिडिओ इएसपीएन क्रिकइन्फोने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दिसते की विराट नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत आहे. तसेच जडेजा त्याला गोलंदाजी करत आहे.

यादरम्यान जडेजाने टाकलेला एक चेंडू विराटला खेळता आला नाही. हा चेंडू थेट मधल्या स्टंम्पवर जाऊन आदळला. हा चेंडू पाहून विराटनेही आश्चर्य वाटल्याचे हावभाव केले.

जडेजाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापटट्णमला 2-6 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात 200 कसोटी विकेट्सचा टप्पा पार केला आहे. तसेच तो कसोटीमध्ये सर्वात जलद 200 विकेट्सचा टप्पा पार करणारा डावकरी गोलंदाज ठरला आहे. त्याने 44 कसोटी सामने आत्तापर्यंत खेळले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघ सध्या 1-0 असा आघाडीवर आहे. भारताने विशाखापट्टणमला झालेल्या पहिल्या कसोटीत 203 धावांनी विजय मिळवला होता.

त्यामुळे उद्यापासून पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याची भारतीय संघाला संधी आहे. तर मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्याची दक्षिण आफ्रिकेला संधी आहे.

Loading...
You might also like
Loading...