इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले येथे खेळला गेला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने पुनरागमन केले होते. मात्र, चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रातच भारताचे उर्वरित आठही गडी बाद झाल्याने यजमान इंग्लंडने एक डाव आणि ७६ धावांनी मोठा विजय साजरा केला. यासह ही मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. मात्र, या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला.
प्रमुख अष्टपैलू झाला दवाखान्यात भरती
हेडिंग्ले कसोटी गमावल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू व चाहते निराश असतानाच इंग्लंडवरून भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली. भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजा याला सामन्यानंतर दवाखान्यात भरती केले गेले. जडेजाने स्वतः सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली. जडेजा या छायाचित्रात दवाखान्यात रुग्णांसाठी देण्यात येणारे कपडे घातलेला दिसत आहे. त्याला स्कॅनसाठी दवाखान्यात नेल्याचे सांगण्यात आले.
तिसऱ्या कसोटीत झाला होता दुखापतग्रस्त
रवींद्र जडेजा हा या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी दुखापतग्रस्त झाला होता. क्षेत्ररक्षण करत असताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही काळ मैदानाबाहेर देखील गेलेला. जडेजाने लीड्स कसोटीत आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले होते. गोलंदाजी करताना त्याने हसिब हमीद व मोईन अली यांचे बळी मिळवलेले. तर, फलंदाजी करताना भारताच्या दुसऱ्या डावात पाच चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३० धावा बनविलेल्या.
भारतासाठी मोठा धक्का
जडेजा २ सप्टेंबरपासून ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील चौथ्या कसोटीमध्ये सहभागी न झाल्यास भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असेल. कारण या मैदानावरील खेळपट्टी ही फिरकीपटूंना अनुकूल असते. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन या सामन्यात जडेजासह अनुभवी रविचंद्रन अश्विनला सामन्यात उतरवू शकते. जडेजाच्या प्रकृतीविषयी काय बातमी समोर येते, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“आम्ही भारतासहित कोणत्याही संघाला हरवू शकतो”, पाकिस्तानी खेळाडूने केला दावा
धावांचा रतीब घालणारा रूट फलंदाजी करताना कधीच घालत नाही टोपी, ‘हे’ आहे कारण
चेतेश्वर पुजाराचा तो शॉट पाहून अंपायरही घाबरले, भीतीपोटी असं वाचवलं स्वत:ला, पाहा व्हिडिओ