इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याला महिन्या पेक्षाही कमी कालावधी उरला आहे. यामुळे आयपीएलबाबत आता सर्व चित्र स्पष्ट होत आहेत. अनेक खेळाडूंनी दुसऱ्या टप्प्यातून आपले नाव मागे घेतले आहे, तर अनेक नवीन खेळाडूंना आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात खेळण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. यातच आता रॉयल चॅलेंजेस बेंगलोरच्या (आरसीबी) चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे.
आरसीबीने न्यूझीलंडच्या फिन ऍलन ऐवजी सिंगापूरच्या २५ वर्षीय टीम डेविडला संघात सामील केले होते. त्याने सध्या सुरू असलेल्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये सेंट लुसिया किंग्सकडून खेळताना आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच धमाकेदार फलंदाजी केली आहे. डेविडने केवळ २८ चेंडूंमध्ये २०० च्या स्ट्राईक रेटने ५६ धावा कुटल्या. ज्यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. आता हाच खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आरसीबीकडून खेळणार आहे.
डेविडने याआधीही आपल्या धमाकेदार खेळीने सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान डेविड क्रिकेटमध्ये सिंगापूर संघाकडून खेळतो. डेविडने आतापर्यंत १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४२.५० च्या सरासरीने ५५८ धावा केल्या आहे. ज्याचा त्याचा स्ट्राईक रेट देखील १५८ च्यावर आहे. यामध्ये त्याने ४ अर्धशतकेसुद्धा लगावले आहेत.
तसेच टीम डेविडने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये देखील १५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २ शतक आणि ५ अर्धशतकाच्या मदतीने ७८.७७ च्या सरासरीने ७०९ धावा केल्या आहेत. यातही त्याचा स्ट्राईक रेट १२१ च्यावर आहे. डेविडचे वडील रोड्रिक डेव्हिड ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्सचे रहिवासी आहेत. ते देखील एक वेगवान गोलंदाज होते. जे सिंगापूरकडून खेळण्यासाठी येथे आले होते. डेविडचा जन्म देखील सिंगापूरचाच आहे.
तसेच टीम डेविडने आतापर्यंत एकूण ४९ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ११७१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची ३६ पेक्षाही जास्तची सरासरी आहे. याच कारणामुळे विराट कोहली आणि आरसीबीने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला संघात सामील करून घेतले.
डेविडने जगभरातील अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील आपला सहभाग नोंदवला आहे. डेविड आतापर्यंत पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये लाहोर कलंदर्स, कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट लुसिया किंग्स, बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉर्चर्स आणि होबार्ट हरिकेन्स या संघांसोबत देखील खेळलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–डीआरएसने केला पुजाराचा घात, अवघ्या ९ धावांनी हुकलं कसोटी शतक, पाहा व्हिडिओ
–बिग ब्रेकिंग! पराभवानंतर भारताचा प्रमुख खेळाडू झाला दवाखान्यात दाखल
–“आम्ही भारतासहित कोणत्याही संघाला हरवू शकतो”, पाकिस्तानी खेळाडूने केला दावा