आयपीएल2020मध्ये खेळल्या गेलेल्या दहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्सला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करतांना मुंबई संघाने फक्त 7 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, आरसीबीतर्फे सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार विराट कोहलीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
या सामन्यात आरसीबी संघाचा अनुभवी फलंदाज एबी डिविलिअर्स यष्टिरक्षण करताना दिसला. यामुळे संघ संतुलित झाला आहे असे आरसीबी संघाचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरला वाटते.
अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाजाला मिळू शकते संधी
चार षटकांत 12 धावा देऊन वॉशिंग्टन सुंदरने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची महत्त्वाची विकेट घेतली. सामन्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर देतांना वॉशिंग्टन डिविलिअर्सबद्दल म्हणाला, “अशी कोणतीही गोष्ट नाही जी एबी डिविलिअर्स करू शकत नाही. संघ व्यवस्थापन त्याला जी जबाबदारी देतात ती तो व्यवस्थितपणे पार पडतो. तो बर्याच वर्षांपासून आरसीबीसाठी खेळत आहे. एबीने यष्टीरक्षण केल्यामुळे आमचा संघ अधिक संतुलित झाला आहे. त्यामुळे संघाच्या गरजेनुसार अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज खेळू शकतो. माझ्या मते त्याने यष्टिरक्षण केल्यामुळे गोलंदाजाला अधिक फायदा होतो.”
डेविलिअर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध यष्टीरक्षण करताना सुर्यकुमार यादवचा झेल घेतला होता. तसेच त्याने फलंदाजी करताना 24 चेंडूत 55 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात तो सामनावीरही ठरला होता.