मुंबई । भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन म्हणजे फलंदाजीची नजाकत. फिरकी आणि वेगवान गोलंदाजी तंत्रशुद्ध पद्धतीने कशी खेळतात याचे उत्तम उदाहरण सांगण्यासाठी मोहम्मद अझरुद्दीन यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी आपल्या कारकीर्दीत दिग्गज गोलंदाजांचे मनसुबे उधळून लावत लाजवाब खेळी केल्या होत्या. त्यांच्यासारखे शैलीदार फटके मारण्याची कला भारतात कुणाकडेच नव्हते.
एका मुलाखतीत मोहम्मद अझरुद्दीन यांनी नुकतेच विराटच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, “मी भारतीय संघासोबत काम करण्यास इच्छुक आहे. मला संधी मिळाल्यास विनाशर्त स्वीकारेन. भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यास मी तयार आहे.”
“मी जर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झालो तर भारतीय संघाला स्वतंत्र फलंदाजी प्रशिक्षक नेमण्याची गरज नाही. सध्या भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ खूप मोठा आहे. हा मोठा सपोर्ट स्टाफ पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात माझा हातखंडा आहे. त्यामुळे मी कोणत्याही संघाला प्रशिक्षण देऊ शकतो.”
आयपीएल बाबतीत बोलताना अझरुद्दीन म्हणाले की, “यंदाच्या वर्षात आयपीएल होईल अशी आशा आहे. या लीगने गेल्या दहा-बारा वर्षात खूप काही दिले आहे. आयपीएल असा प्लॅटफॉर्म आहे जिथे क्रिकेटपटूंवर खूप लक्ष दिले जाते. त्यांनी दमदार कामगिरी केली तर त्यांची नवी ओळख निर्माण होते. जरा विचार करा, आयपीएल नसती तर हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह हे अजूनही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संघर्ष करत राहताना दिसून आले असते .”
क्रिकेटपटू ते अध्यक्ष
अझहरुद्दीन यांनी 174 वनडे सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्व केले होते. ते वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारे दुसरे भारतीय खेळाडू आहेत. क्रिकेटनंतर त्यांनी ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून देखील आले होते. सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. यासोबतच ते विविध प्रसारमाध्यमात क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून काम करत आहेत.
दुर्मिळ विक्रम
1990 च्या दशकात मोहम्मद अझरुद्दीन यांचा जागतिक क्रिकेटमध्ये खूप दबदबा होता. 1992 ते 1999 दरम्यान झालेल्या 3 विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळणारा ते एकमेव कर्णधार आहेत. सर्वोत्तम नैसर्गिक क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर एका दुर्मीळ विक्रमाची नोंद आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यात तीन शतके ठोकण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
अझरुद्दीन यांची कारकीर्द
अझरुद्दीन यांनी 99 कसोटी सामन्यांत 45.04 च्या सरासरीने 6 हजार 252, तर 334 वनडे सामन्यांत 36.92 च्या सरासरीने 9 हजार 378 धावा केल्या आहेत. कसोटीत 22 तर वनडेत 7 शतके ठोकली आहेत.