आज भारताविरुद्ध कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणारा टेलर म्हणाला…

वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. हा सामना न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरचा 100 वा कसोटी सामना आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी, वनडे आणि टी20 या तीन्ही प्रकारात प्रत्येकी 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

या सामन्याच्या पूर्वसंध्येला(20 फेब्रुवारी) न्यूझीलंडचे माजी यष्टीरक्षक फलंदाज इयान स्मिथ यांनी टेलरला एका छोट्या कार्यक्रमात 100 व्या कसोटी सामन्याची कॅप प्रदान केली. यावेळी न्यूझीलंड संघातील खेळाडू आणि टेलरचा मुलगा जॉन्टी हा देखील उपस्थित होता.

या विक्रमाबद्दल बोलताना टेलर सामन्याआधी म्हणाला, ‘या प्रसंगाबद्दल खरोखर उत्साही आहे. आज सकाळी उठल्यानंतर पाऊस असणे ही चांगली गोष्ट नव्हती. काल रात्री इयान स्मिथ यांनी छोटे भाष्य केले (टेलरच्या 100 व्या कसोटीबद्दल). संघ आणि कुटुंबासाठी असे काहीतरी अनुभवणे खूप छान आहे जे त्यांना पुन्हा कदाचीत अनुभवता येणार नाही.’

तसेच टेलर गमतीने म्हणाला, ‘मला वाटते की मला 100 वाईन्सच्या बॉटल्स पिण्याची गरज आहे. पण सध्या काही दिवसांसाठी त्यांना राखून ठेवलेलेच बरे. मी स्टिफन फ्लेमिंग, ब्रेंटन मॅक्यूलम आणि डॅनिएल विट्टोरी यांची परंपरा कायम ठेवली, त्यांनीही 100 कसोटी सामने खेळले आहेत. आशा आहे की हा खास टप्पा आम्ही विजय मिळवून सेलिब्रेट करु.’

आजच्या दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी सामन्यापूर्वी होणाऱ्या राष्ट्रगीतावेळी टेलरची 8 वर्षांची मुलगी मॅकेन्झी आणि 6 वर्षांचा मुलगा जॉन्टी न्यूझीलंड संघासह मैदानात उपस्थित होते. त्याचबरोबर या सामन्यासाठी आज स्टेडियममध्ये टेलरचे कुटुंबिय आणि त्याचे जवळचे सहकारी उपस्थित आहेत.

त्याचबरोबर सामन्यापूर्वी बुधवारी टेलर म्हणाला होता की ‘कुणाचीही कारकीर्द परिपूर्ण नाही आणि फलंदाज म्हणून तुम्ही नक्कीच कधीतरी अपयशी ठरत असता. चुका आणि परिस्थिती आपल्यामध्ये एक व्यक्ती म्हणून निश्चितपणे प्रगती घडवून आणतात.

‘कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून तुम्हाला अनेक चढउतार पहायला मिळतात आणि मीसुद्धा यातून गेलो आहे. आमच्या टीमनेही अशी वेळ पाहिली आहे. वेलिंग्टनचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि मला आशा आहे की या क्षणाचाही मला अभिमान वाटेल आणि मी येथून बरेच संस्मरणीय क्षण घेऊन जाईल.’

त्याचबरोबर टेलरने त्याच्या यशामागे त्याच्या कुटुंबाचेही मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे.

2006ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टेलरच्या नावावर आज 100 कसोटी, 231 वनडे आणि 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची नोंद झाली आहे.

त्याचबरोबर टेलर 100 कसोटी सामने खेळणारा न्यूझीलंडचा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी न्यूझीलंडकडून डॅनिएल विट्टोरी(112), स्टिफन फ्लेमिंग(111) आणि ब्रेंडन मॅक्यूलम(101) यांनीच 100 किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळले आहेत.

You might also like