हिमाचल प्रदेशातील आणखी एक युवा महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर ताकद दाखवणार आहे. शिमलाच्या सुषमा वर्मानंतर आता रेणुका सिंग ठाकूर भारतीय संघाचा भाग असेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टी२० मालिकेसाठी तिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली असून, ती प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग बनली आहे.
हलाखीच्या स्थितीतून मारली मजल
रेणुकाचा जन्म हिमाचलच्या शिमला जिल्ह्यातील रोहरू तालुक्यातील परसा गावात झाला. रेणुका तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. आता ती आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिचे वडील केहर सिंग यांची इच्छा होती की, त्यांची मुलगी क्रिकेटपटू व्हावी.
प्रसारमाध्यमांशी बोलताना रेणुकाने सांगितले की, “हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. माझ्या वडिलांचे क्रिकेटवर प्रचंड प्रेम होते. ते विनोद कांबळी यांंचे मोठे चाहते होते. त्यांनी मुलाचं नाव विनोद ठेवलं होतं. अशी आशा आहे की, ते वरून मला पाहत असतील.” रेणुकाच्या वडिलांचे १९९९ मध्ये निधन झाले होते.
अशी घडली कारकीर्द
वडिलांच्या निधनानंतर रेणुकाच्या आईला त्यांच्या जागी नोकरी मिळाली होती. त्यांनी अत्यंत मेहनतीने आपल्या मुलांचा सांभाळ केला. रेणुका सध्या बेंगलोरमध्ये आहे. रेणुकाने रोहरूमध्ये स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यानंतर तिची हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एचपीसीए) धर्मशाला अकादमीसाठी निवड झाली.
रेणुका एक वेगवान गोलंदाज असून, तिने क्रिकेटचे बारकावे एचपीसीएचे प्रशिक्षक पवन सेन यांच्याकडून शिकले आहेत. २०१९ मध्ये, रेणुकाने बीसीसीआय महिला वनडे स्पर्धेत सर्वाधिक २३ बळी मिळवले आहेत. त्याच वर्षी तिची भारतीय महिला संघ अ संघासाठी निवड झाली होती.
सुन्नीची सुषमा देखील भारतीय संघाचा भाग होती
रेणुकाच्या आधी हिमाचलच्या दोन महिला खेळाडू भारतीय संघाचा भाग बनल्या आहेत. शिमल्यातील सुन्नी येथील सुषमा वर्मा देखील भारतीय महिला संघात खेळली आहे. सुषमा हिने २०१७ महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मूळ पंजाबची असलेली मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारी हरलीन देओल भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाची मुख्य सदस्य आहे. याव्यतिरिक्त तनुजा कंवर हिचीदेखील २०१९ मध्ये भारतीय संघात निवड झालेली. परंतु, ती अंतिम अकरामध्ये स्थान मिळवू शकली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
क्या बात है..! रांचीच्या या चिमुरड्यांचा धोनीच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न
नको तेच झालं! इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ‘तो’ नकोसा विक्रम झाला
“जो रूट कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत, पण आमच्या पाठिब्यांची नितांत गरज आहे”