ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी भारतीय खेळाडू अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिल यांच्या फलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रहाणे आणि गिलकडून काही तरी शिकण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पाहुण्या भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सने पराभवाची धूळ चारली होती. यासह भारताने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. भारतीय संघाच्या या विजयात रहाणे आणि गिल यांचा मोलाचा वाटा राहिला.
बॉक्सिंग डे कसोटीत रहाणे-गिलने केली जबरदस्त फटकेबाजी
बॉक्सिंग डे कसोटीतील पहिल्या डावात भारताचा प्रभारी कर्णधार रहाणेने १२ चौकारांच्या मदतीने ११२ धावांची अफलातून खेळी केली. सोबतच दुसऱ्या डावात २७ धावा करत संघाला सामना जिंकून दिला. दुसरीकडे युवा फलंदाज गिलने पहिल्या डावात ६५ चेंडूत ८ चौकार ठोकत ४५ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात रहाणेसोबत मिळून नाबाद ३५ धावा करताना ६१ धावांची भागीदारी केली. दरम्यान त्याने ७ चौकारही लगावले.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये दम नव्हता- पाँटिंग
रहाणे व गिल यांच्याविषयी बोलताना पाँटिंग म्हणाले की, “मला माहिती आहे की बॉक्सिंग डे कसोटीतील दुसऱ्या डावात भारतीय संघ कमी धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. त्यामुळे गिल आणि रहाणेने मोकळेपणाने जोरदार शॉट्स ठोकले. पण मला वाटते की, या दोघांनी मिळून दुसऱ्या कसोटी सामन्यात जेवढे पुल शॉट मारले आहेत, तेवढे आमच्या फलंदाजांनी मिळून दोन कसोटी सामन्यांच्या चार डावातही मारले नसतील.”
“भारतीय संघाच्या फलंदाजांनी आमच्या गोलंदाजांविरुद्ध खूप दमदार फलंदाजी केली आहे. याउलट आमच्या फलंदाजांमध्ये अजिबात दम नव्हता. यावरुन असे म्हणता येईल की, भारतीय संघाच्या गोलंदाजांनीही खूप चांगली गोलंदाजी केली,” असे शेवटी बोलताना पाँटिंग म्हणाले.
लवकरच होणार तिसरा कसोटी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. आता ७ जानेवारीपासून हे दोन्ही संघ तिसरा कसोटी सामना खेळणार आहेत. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर हा सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणेने सुट्ट्यांमध्ये ‘हे’ काम केलं, म्हणूनच त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्या, प्रशिक्षकाचा खुलासा
आपल्या भावांसाठी कायपण.! चाहत्याने भरले भारतीय खेळाडूंच्या जेवणाचे पैसे, ट्विटरवर शेअर केला अनुभव
एमएस धोनीच्या शेतीची चर्चा परदेशात, ‘ही’ एजन्सी भाज्या विकण्यासाठी करतेय मदत