इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील क्वालिफायरचा पहिला सामना रविवारी (१० ऑक्टोबर) पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला देखील विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु कर्णधार रिषभ पंतने काही चुकीचे निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
पहिल्या डावात केली ही मोठी चूक
या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली होती. तर रिषभ पंतने नाबाद ५१ धावांची खेळी केली होती. दरम्यान शेवटचे षटक खेळण्यासाठी १९ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रिषभ पंतने एक धाव घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर जेव्हा तो २० वे षटक खेळण्यासाठी स्ट्राइकवर आला. त्यावेळी त्याला सुरुवातीच्या ३ चेंडूवर मोठा फटका खेळण्यास अपयश आले होते. त्यावेळी त्याने १ धाव घेण्यासही नकार दिला होता. नॉन स्ट्राइकवर फलंदाजी करत असलेला टॉम करण देखील फलंदाजी करू शकत होता, तरीदेखील रिषभ पंतने त्याला स्ट्राइक दिली नव्हती.
दुसऱ्या डावात केली ही मोठी चूक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक दिग्गजांना बाद करणारा गोलंदाज कागिसो रबाडा दिल्ली कॅपिटल्स संघात आहे. बऱ्याच सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवून दिला आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याचे एक षटक शिल्लक असताना देखील रिषभ पंतने त्याला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले नव्हते. कागिसो रबाडाने ३ षटके गोलंदाजी करत अवघ्या २३ धावा खर्च केल्या होत्या. तरीदेखील रिषभ पंतने त्याला गोलंदाजी दिली नव्हती. शेवटच्या षटकात १३ धावांची आवश्यकता असताना, टॉम करण गोलंदाजीला आला आणि चेन्नई सुपर किंग्स संघाने २ चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना आपल्या नावावर केला.
या अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्स संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. सोमवारी (११ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटरची लढत पार पडणार आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवणार तो संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
जशास तसे! ऋतुराजला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी अश्विनने लढवली युक्ती, फलंदाजाने त्यालाच घडवली अद्दल
हे फक्त धोनीच करू शकतो! ‘कॅप्टनकूल’ने वाचल्या ऋतुराजच्या डोक्यातील गोष्टी, स्वत:च केला उलगडा