मुंबई। वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील (IPL 2022) ३४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. शुक्रवारी (२२ एप्रिल) झालेला हा सामना राजस्थानने १५ धावांनी जिंकला. असे असले तरी, या सामन्यात सर्वाधिक चर्चा नो बॉलच्या वादाची झाली. त्यावर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपापली मते स्पष्ट केली आहे.
नक्की काय झाले होते?
या सामन्यात राजस्थानने दिल्लीसमोर २२३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने चांगली कामगिरी केली होती. पण, अखेरच्या षटकात त्यांना ३६ धावांची गरज होती. यावेळी दिल्लीकडून कुलदीप यादव आणि रोवमन पॉवेल फलंदाजी करत होते. राजस्थानकडून ओबेड मॅकॉय गोलंदाजी करत होता. त्याने या टाकलेल्या या षटकातील पहिल्या तिन्ही चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकत रोमांच वाढवला होता.
पण, याचवेळी या षटकातील तिसरा चेंडू मॅकॉयने फुलटॉस टाकला होता, तो नो बॉल असल्याचा करार मैदानावरील पंचांकडून देण्यात आला नाही. यावर दिल्ली कॅपिटल्सच्या गोटातून निराशा व्यक्त करण्यात आली. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतने तर फलंदाजांना परत येण्याचा इशाराही केला होता. पण नंतर त्याची फलंदाजी प्रशिक्षक प्रविण आमरे आणि सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने समजूत काढली.
यावेळी प्रविण आमरे मैदानातही गेले होते, त्यांनी पंचांशी चर्चा देखील केली. त्यानंतर उर्वरित खेळ पूर्ण करण्यात आला. नंतर, पॉवेल अखेरच्या चेंडूवर बाद झाला. शेवटच्या तीन चेंडूत दिल्लीकडून २ धावाच झाल्या, परिणामी दिल्लीला १५ धावांनी पराभव स्विकारावा लागला (no ball controversy).
https://twitter.com/Twinkle_Agrawl/status/1517692446896918528
दोन्ही कर्णधारांच्या प्रतिक्रिया
सामन्याच्या अखेरच्या षटकात जे काही नाट्य घटले, त्यावर सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘तो फुलटॉस चेंडू होता. पंचांनी त्याला अधिकृत चेंडूचा करार दिला. पण फलंदाज त्याला नोबॉल देण्याची मागणी करत होते. पण पंचांनी त्यांचा निर्णय स्पष्ट केला आणि ते त्यावर स्थिर राहिले.’
तसेच दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) म्हणाला, ‘पॉवेलने आमच्यासाठी अखेरीस संधी निर्माण केली होती. मला वाटले की आमच्यासाठी नो बॉल महत्त्वपूर्ण झाला असता. मला वाटते की आपण तो नोबॉल आहे की नाही तपासू शकत होतो. पण, हे माझ्या नियंत्रणाक नव्हते. हो, मी निराश आहे आणि याबद्दल मी काही करू शकत नाही. मैदानावर सर्वांनी पाहिले की हा नोबॉल होता. मला वाटते की तिसऱ्या पंचांनी यात हस्तक्षेप करायला हवा होता.’
तसेच प्रविण आमरे मैदानात गेल्याच्या घटनेबद्दल पंत म्हणाला, ‘नक्कीच ते बरोबर नव्हते. पण जे काही आमच्याबरोबर झाले, ते देखील बरोबर नव्हते. ही घटना एका रोमांचक क्षणी झाली. ही चूक दोन्ही बाजूंनी झाली आणि हे निराशाजनक आहे, कारण स्पर्धेत आम्ही चांगील पंचगिरी होतानाही पाहिली आहे.’
त्याचबरोबर लक्ष्याच्या जवळ पोहचल्याबद्दल पंतने आनंद व्यक्त केला, तसेच त्याने संघाला निराश न होता पुढच्या सामन्यासाठी सज्ज होण्याचा सल्ला दिला.
राजस्थानचा विजय
या सामन्यात (DC vs RR) राजस्थानने जोस बटलरच्या ११६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत २ बाद २२२ धावा उभारल्या. राजस्थानकडून बटलरव्यतिरिक्त देवदत्त पडीक्कलने ५४ धावांची खेळी केली, तर संजू सॅमसनने नाबाद ४६ धावांची खेळी केली. दिल्लीकडून खलील अहमद आणि मुस्तफिजूरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून रिषभ पंतने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. तसेच पृथ्वी शॉ आणि ललीत यादवने प्रत्येकी ३७ धावांची खेळी केली. तसेच अन्य फलंदाजांनीही छोटेखानी खेळी केल्या. अखेरीस रोवमन पॉवेलेने आक्रम खेळ करताना १५ चेंडूत ५ षटकारांसह ३६ धावा केल्या. मात्र, दिल्लीला २० षटकांत ८ बाद २०७ धावाच करता आल्या. राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! पंतपासून ते शार्दुलपर्यंत आख्खी दिल्ली टीम एकमेकांकडे पाहात होती रागाने
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं! राजस्थानने १५ धावांनी उडवला दिल्लीचा धुव्वा