Rishabh Pant gets a chance to create history: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर (Old Trafford Stadium, Manchester) खेळला जाईल. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेत भारतीय संघ सध्या 1-2 अशा पिछाडीवर आहे. अशा स्थितीत भारतीय संघ मँचेस्टरमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधू इच्छितो. दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे एक खास रेकाॅर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असेल. तो आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनू शकतो. (Rishabh Pant World Test Championship)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सध्या रोहित शर्मा आहे. नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहितने WTC मध्ये 40 सामन्यात 2,716 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर पंतचे नाव आहे. पंतने आतापर्यंत 37 सामन्यात 2,677 धावा केल्या आहेत. त्याला रोहितला मागे टाकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. जर पंतने मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात 39 धावा केल्या, तर तो रोहित शर्माची बरोबरी करेल. तर 40 धावा करताच तो रोहितच्या पुढे जाईल.
WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, तिथे तिसऱ्या क्रमांकावर माजी दिग्गज कसोटी फलंदाज विराट कोहलीचे नाव आहे. त्याने 46 सामन्यात 2,617 धावा केल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर भारताचा सध्याचा कसोटी कर्णधार शुबमन गिलचे नाव आहे. गिलने WTC मध्ये आतापर्यंत 35 सामन्यात 2,500 धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर दिग्गज अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाव आहे. जडेजाने 42 WTC सामन्यात 2,212 धावा केल्या आहेत.
पंतबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही त्याने शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने या मालिकेत आतापर्यंत 3 सामन्यांच्या 6 डावांमध्ये 70.83च्या सरासरीने 425 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 78.41 राहिला आहे. पंतने या मालिकेत आतापर्यंत 2 शतकांसह 2 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 134 धावा आहे. तर WTC मध्ये आतापर्यंत पंतने 66 डावांमध्ये 43.17च्या सरासरीने 2,677 धावा केल्या आहेत. तिथे त्याच्या नावावर 6 शतकांसह 15 अर्धशतके आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 146 आहे. (Rishabh Pant Test performance)
WTC मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाज
रोहित शर्मा: 2,716 धावा (40 सामने)
रिषभ पंत: 2,677 धावा (37 सामने)
विराट कोहली: 2,617 धावा (46 सामने)
शुबमन गिल: 2,500 धावा (35 सामने)
रवींद्र जडेजा: 2,212 धावा (42 सामने)






