---Advertisement---

जखमी वाघांचा संघ अखेरपर्यंत झुंजला अन् गर्विष्ठ कांगारूंच्या घशातून विजय खेचून आणला! पाहा ‘तो’ अभिमानास्पद क्षण

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 3:02 PM
---Advertisement---

नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चौथा आणि शेवटचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चिवट झुंज देत यजमान ऑस्ट्रेलिया संघाला ३ विकेट्सने पराभूत केले. यासह २-१ च्या फरकाने भारताने कसोटी मालिका खिशात घातली. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने जबरदस्त चौकार मारत या सामन्याचा विजयी शेवट केला.

झाले असे की, सामन्याच्या शेवटच्या ९६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडने शार्दुल ठाकूरची विकेट काढली. त्यानंतर भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावांची आवश्यकता होती. पुढील पाचव्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेला पंत एकही धाव घेऊ शकला नाही. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर पंतने जोरदार शॉट मारला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्याचा चेंडू अडवण्याचा प्रयत्नही केला. परंतु ते अपयशी ठरले आणि चेंडू सरळ सीमारेषेबाहेर गेला.

पंतच्या या जबरा चौकाराला पाहून सामना विजयाच्या उत्साहाने मैदानाबाहेर बसलेले भारतीय खेळाडू वेगाने धावत मैदानावर उतरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने पंतच्या त्या मॅच विनिंग चौकाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला क्रिकेट रसिकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली आहे. सोबतच पंतचे कौतुकही केले आहे.

दुसऱ्या डावात पंतची आतिशी फलंदाजी –

भारतीय संघाची वरची फळी बाद झाल्यानंतर पंत मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने सामना विजयाचे नाणे खणखणीत वाजवूनच मैदान सोडायचे या उद्देशाने बचावात्मक पण आक्रमक फलंदाजी केली. सामन्याच्या शेवटपर्यंत नाबाद राहत पंतने १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या. या खेळीसाठी त्याने १३८ चेंडू खेळले. त्याच्या या तडाखेदार खेळीने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सामन्याचा थोडक्यात आढावा –

ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लॅब्युशेनच्या शतकी खेळीच्या जोरावर ३६९ धावा केल्या होत्या. या डावात भारताकडून टी नटराजन, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने शार्दुल ठाकूर (६७) आणि वॉशिंग्टन सुंदर (६२) यांच्या शतकी भागीदारीसह पहिल्या डावात ३३६ धावा केल्या.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २९४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथने ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने या डावात सर्वाधिक ५ विकेट्स आणि शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या डावातील ३३ धावांच्या आघाडीसह ३२८ धावांचे आव्हान दिले होते. भारताने ७ विकेट्स गमावत ९७ षटकात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत सामना जिंकला.

प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत जिंकला सामना – 

विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव,इशांत शर्मा, केएल राहुल, रविंद्र जडेजा अशा अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताने हा सामना जिंकला आहे. यातील विराट व्यतिरिक्त सर्व प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे या मालिकेतील काही सामन्यांना मुकावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रिस्बेन टेस्ट : भारताकडून यजमान ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत! सामन्यासह २-१ च्या फरकाने ऐतिहासिक मालिका विजय

ब्रिस्बेन टेस्ट : ऐतिहासिक विजयासह भारताने कांगारूंच्या तीन दशकांच्या सुखस्वप्नाला लावला सुरुंग, वाचा

नॅथनच्या चेंडूवर ‘असा’ पकडला स्मिथने शुबमन गिलचा सोपा झेल, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---