पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात (IPL 2022) ३९ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (२६ एप्रिल) सामना झाला. हा सामना राजस्थान रॉयल्सने २९ धावांनी जिंकला. हा राजस्थान रॉयल्सचा ६ वा विजय होता. राजस्थानच्या या विजयात अष्टपैलू रियान पराग याने मोलाचा वाटा उचलला. त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दिलेल्या योगदानामुळे त्याला या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. याबरोबरच परागने एक मोठा विक्रमही केला.
या सामन्यात सुरुवातीला महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५६ धावांची खेळी केली. तसेच त्याने या सामन्यात क्षेत्ररक्षण करतानाही चार झेल घेतले. यात त्याने बेंगलोरच्या विराट कोहली, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई आणि हर्षल पटेल या खेळाडूंचे झेल घेतले.
त्यामुळे पराग (Riyan Parag) असा तिसराच खेळाडू ठरला, ज्याने एकाच आयपीएल सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आणि ४ किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेतले. यापूर्वी असा विक्रम जॅक कॅलिस (Jacques Kallis) आणि ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांनी केला होता.
कॅलिसने २०११ साली कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध ही कामगिरी केली होती. तसेच गिलख्रिस्टने २०१२ साली पंजाब किंग्स (तेव्हा किंग्स इलेव्हन पंजाब) संघाकडून चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध अशी कामगिरी केली होती (Players with 50+ runs and 4+ catches in an IPL match).
पराग ठरला राजस्थानच्या विजयाचा नायक
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सकडून रियान परागच्या खेळीमुळे राजस्थानला २० षटकांत ८ बाद १४४ धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा डाव १९.३ षटकांत ११५ धावांवरच संपुष्टात आला. बेंगलोरकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या. अन्य कोणाला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.
गोलंदाजीत बेंगलोरकडून मोहम्मद सिराज, वनिंदू हसरंगा आणि जोस हेजलवूड यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच हर्षल पटेलने १ विकेट घेतली. राजस्थानकडून कुलदीप सेनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आर अश्विनने ३ विकेट्स घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा बाद होणारा बेंगलोर दुसरा संघ, पहिल्या क्रमांकावर ‘या’ संघाचे नाव
Video: आधी भांडण, मग हँडशेकसाठी नकार; रियान पराग-हर्षल पटेल यांच्यात भर मैदानात राडा
बाऊन्स टेनिस अकादमी-एमएसएलटीए एआयटीए सुपर सिरिज: साईइती वराडकर, श्रेया पठारे यांचा सनसनाटी विजय