क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये पूर्ण न होऊ शकलेली ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ पुन्हा सुरू होणार आहे. भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी या स्पर्धेच्या तारखांची घोषणा नुकतीच केली. यापूर्वी, पुणे आणि मुंबई येथे खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील सामने आता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील मैदानावर खेळविले जातील. ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू सहभागी होत असतात.
कोरोनामुळे अर्धवट राहिली होती स्पर्धा
गतवर्षी मार्च महिन्यात सुरू झालेली ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ अचानक आलेल्या कोरोना महामारीमुळे अर्ध्यात बंद केली गेली होती. स्पर्धेत पाच सामने खेळले गेलेले. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले प्रत्येक देशाचे दिग्गज खेळाडू खेळताना दिसतात. इंडियन लिजंड्स, वेस्ट इंडीज लिजंड्स, ऑस्ट्रेलिया लिजंड्स, श्रीलंका लिजंड्स व दक्षिण आफ्रिका लिजंड्स हे संघ सहभागी झाले होते.
भारताने खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. भारतीय संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकर करत आहे. त्याच्या सोबतीला भारतीय संघात वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, मोहम्मद कैफ, झहीर खान, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल यांसारखे माजी खेळाडू आहेत. इतर संघांतही ब्रेट ली, ब्रायन लारा, जोंटी रोड्स, मुथय्या मुरलीधरन यांच्यासारखे नामांकित खेळाडू खेळतात.
https://twitter.com/RSWorldSeries/status/1353599179533107200
गावसकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ च्या अनुषंगाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेतली. त्यामुळे आता ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ चे उर्वरित सामने रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. ही स्पर्धा २ मार्च २०२१ ते २१ मार्च २०२१ यादरम्यान खेळवली जाईल.
जनजागृतीसाठी खेळवली जाते स्पर्धा
जगभरातील नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांविषयी जनजागृती होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सुनील गावस्कर यांची व्यवस्थापन कंपनी स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेचे प्रसारण वायकॉम १८ च्या कलर्स वाहिनीवरून तसेच वूट व जिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून केले जाते.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा
भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त इतके दिवस
आयएसएल २०२०-२१ : चेन्नईयीनने आघाडीवरील मुंबई सिटीला रोखले