पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाईल. भारत या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. पण शेवटच्या सामन्यात भारताच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या सहभागावर शंका कायम आहे. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा ओव्हल कसोटीदरम्यान जखमी झाले होते. यामुळे इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान दोन्ही खेळाडू संपूर्ण वेळ मैदानाबाहेर होते.
दोन्ही खेळाडूंनी ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात दुसऱ्या गड्यासाठी १५३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. पुजाराने ६१ धावा केल्या होत्या, तर रोहितने परदेशात पहिले कसोटी शतक करताना १२७ धावांची खेळी खेळली.
यादरम्यान धावताना पुजाराचा डावा पाय मुरगळला होता. त्यानंतर तो खूप अडचणीत दिसला पण त्याने आपला खेळ सुरू ठेवला. यानंतर रोहित शर्मा आपल्या डाव्या गुडघ्याच्या समस्येशी झुंजताना दिसला. त्यानंतर सामना संपताच दोन्ही खेळाडूंची तपासणी करण्यात आली. ज्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही, परंतु दोन्ही खेळाडू अजूनही बीसीसीआयच्या वैद्यकीय संघाच्या देखरेखीखाली आहेत.
आता शेवटचा कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे आणि दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत कोणतेही अद्ययावत माहिती पुढे आलेली नाही. इंग्लंडच्या दुसऱ्या डावादरम्यान दोन्ही खेळाडू पूर्ण वेळ मैदानात उतरले नाहीत. त्यामुळे दोघांच्या खेळण्यावर अजूनही शंका आहे. जर हे दोन खेळाडू तंदुरुस्त नसतील तर मयंक अग्रवाल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांना सलामीला संधी मिळू शकते.
दुसरीकडे, जर पुजारा देखील तंदुरुस्त नसेल, तर सूर्यकुमार यादव शेवटच्या सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना आपण पाहू शकतो. याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराहला कामाचा भार पाहता विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्याजागी मोहम्मद सिराजचे संघात पुनरागमन होऊ शकते. सोबतच उपकर्णधार अजिंक्य रहाणेलाही नारळ मिळण्याची शक्यता आहे.
ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल यांनाही विलगिकरणात ठेवले गेले. म्हणजेच, यावेळी फक्त विक्रम राठोड ड्रेसिंग रूममध्ये आणि मैदानावर प्रशिक्षकाच्या सर्व भूमिका बजावतील. ओव्हल कसोटी जिंकल्यानंतर भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. शेवटच्या सामन्यात भारताला मालिका जिंकायची आहे तर यजमानांना मालिका वाचवायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“बुमराहने मला डेल स्टेनची आठवण करून दिली”, केविन पीटरसन का म्हणाला असं, वाचा सविस्तर
ओव्हल कसोटीचा हिरो ठरलेला बुमराह अखेरच्या सामन्यात होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण