भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला त्याच्या आक्रमक प्रदर्शनासाठी ओळखले जाते. एकाहून एक जबरदस्त चौकार-षटकार मारत तो मोठी आकडी धावसंख्या उभारताना दिसतो. आपल्या याच खेळीचा नमुना रोहितने चेन्नई कसोटीत दिला आहे. शनिवारपासून (१३ पेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत चालू आहे. या लढतीच्या पहिल्या दिवशी रोहितने तूफानी दीडशतकी खेळी केली.
त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना हा मुंबईकर चक्क मराठी बोलताना दिसला. इंडियन प्रीमियर लीगमधील रोहितच्या मुंबई इंडियन्स संघाने त्याचा मराठीत बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने रोहितला मराठीत प्रश्न विचारला. ‘तू चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठी आकडी धावसंख्या करू शकला नाहीस. त्यानंतर आता चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात तू दीडशतक केलेस, या प्रकियेबद्दल तुला काय वाटत?,’ असा त्या पत्रकाराचा प्रश्न होता.
यावर उत्तर देताना रोहित म्हणाला की, “मी आता विचार करायला सोडून टाकलं आहे. मी माझ्या फलंदाजीबद्दल जास्त विचार करत नाही. मी फक्त जी मुमेंट (क्षण) असते, त्यामध्ये राहायला प्रयत्न करतो. कारण की, जे आधी झालय किंवा पुढे होणार, ते आपण कंट्रोल (नियंत्रण) नाही करू शकत. जे आता प्रेझेन्टमध्ये चालू आहे, ते आपण जास्त विचार करायला पाहिजे. मला पण आता मागे काय झालं, पुढे काय होणार, त्याच्यामध्ये अजिबात इन्टरेस्ट (रस) नाही. मला प्रोसेसमध्ये इन्टरेस्ट आहे. करन्ट सिच्युवेशनमध्ये (वर्तमान स्थिती) इन्टरेस्ट आहे आणि मी त्याच सिनारिओमध्ये राहायला बघतो.”
अशाप्रकारे अडखळत्या मराठीत रोहित पत्रकारांशी संवाद साधताना दिसला. मुंबई इंडियन्सने रोहितचा मराठी बोलतानाचा दुर्मिळ क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.
रोहित शर्माची पहिल्या डावातील कामगिरी
रोहितने या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात २३१ चेंडूत १६१ धावा केल्या. यात त्याने १८ चौकार आणि २ षटकार मारले. त्याने त्याचे शतक १३० चेंडूत पूर्ण केले. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ६ बाद ३०० धावा फलकावर नोंदवल्या आहेत. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि पदार्पणवीर अक्षर पटेल नाबाद खेळत आहेत. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी या जोडीवर संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पती नंबर १..! पत्नीच्या बोटांमध्ये वेदना होत असल्याने रोहितने ‘असा’ केला उपचार, पाहा तो प्रेमळ क्षण
ऋतुराज गायकवाडकडे महाराष्ट्राच्या कर्णधारपदाची जबाबदारी, ‘असा’ आहे २० जणांचा संघ
पंत-स्टोक्समध्ये जुंपली! पहिल्या दिवसाच्या शेवटी झाली शाब्दिक बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल