मुंबई। रविवारी (२४ एप्रिल) मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. इंडियन प्रीमीयर लीग २०२२ मध्ये ३७ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागल्याने संघाच्या आणि कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला.
मुंबईचा सलग ८ वा पराभव
मुंबई इंडियन्सचा रविवारी झालेला आयपीएल २०२२ मधील सलग ८ वा पराभव (lose the first eight matches in IPL 2022) होता. आयपीएल हंगामात पहिल्या ८ सामन्यांत सलग पराभवाचा सामना करावा लागलेला मुंबई इंडियन्स पहिलाच संघ ठरला. तसेच आयपीएल हंगामातील पहिले ८ सामने सलग हरणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिला कर्णधार ठरला. यापूर्वी कोणताही संघ सलग ८ सामने आयपीएलमध्ये हरला नव्हता.
मुंबई इंडियन्सला सलग ८ पराभवांना समोरे जावे लागल्याने, त्यांना आयपीएल २०२२ च्या प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडावे लागले आहे. आयपीएल २०२२ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पहिला संघ ठरला आहे. गेल्या १५ वर्षांत मुंबई इंडियन्सची ही सहावी वेळ आहे. यापूर्वी ते २००८, २००९, २०१६, २०१८ आणि २०२१ या ५ वर्षी प्लेऑफमध्ये पोहचले नव्हते.
मुंबईच्या पराभवाने बाबर आझम चर्चेत
एखाद्या संघाने सलग ८ पराभव पाहाण्याची यावर्षीची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग २०२२ (पीएसएल २०२२) मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कराची किंग्स संघाने सलग ८ पराभवाचा सामना केला होता. त्यावेळी बाबर आझम (Babar Azam) देखील पीएसएलमध्ये सलग ८ सामने पराभूत होणारा पहिला कर्णधार ठरला होता.
आता रोहितच्याही नावावर आयपीएल हंगामामध्ये सलग पहिले आठ सामने पराभूत होणारा पहिला कर्णधार होण्याचा नकोसा विक्रम नोंदवला गेल्याने, अनेकांना बाबर आझमची आठवण झाली आहे. योगायोगाने सध्या रोहित भारतीय संघाचा आणि बाबर पाकिस्तान संघाचा कर्णधार देखील आहे.
दरम्यान, पीएसएल २०२२ मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली कराची किंग्सने (Karachi Kings) ९ व्या सामन्यात पहिला विजय नोंदवला होता. पण त्यांना साखळी फेरीतील १० व्या आणि अखेरच्या सामन्यात पुन्हा पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे १० सामन्यांतील केवळ एका विजयामुळे कराची किंग्स गुणतालिकेत अखेरच्या क्रमांकावर राहिले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘मी देखील बेजबाबदार खेळलो,’ रोहितने मुंबईच्या सलग ८ व्या पराभावानंतर मान्य केली चूक
चेन्नईविरुद्ध २ धावा अन् शिखर गाठणार आयपीएलमधील मोठा पल्ला, केवळ विराटलाच जमलाय ‘तो’ विक्रम
मुंबईविरुद्ध मॅच जिंकली, शतक केलं, तरी केएल राहुलला २४ लाखांचा दंड; वाचा नक्की काय केली चूक