भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा हा क्रिकेटविश्वात हिटमॅन नावाने प्रसिद्ध आहे. टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर बऱ्याचशा विक्रमांची नोंद आहे. आता टी२० क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात एकाहून एक जबरदस्त षटकार मारत रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमात पाकिस्तानचा माजी दिग्गज शाहिद आफ्रिदी याला मागे सोडले आहे.
शनिवारी (०६ ऑगस्ट) फ्लोरीडा येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) संघात चौथा टी२० सामना (Fourth T20I) झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १९१ धावांचा विशाल स्कोर उभा केला. भारतीय संघाकडून या डावात कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. परंतु सर्वांच्या चांगल्या खेळीमुळे भारतीय संघाला ही धावसंख्या उभारता आली.
या डावात कर्णधार रोहितने सलामीला फलंदाजीला येत १६ चेंडूत ३३ धावांची छोटेखानी पण उपयुक्त अशी खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने २ चौकार आणि ३ षटकार मारले. ओबेड मॅकॉयच्या तिसऱ्या षटकात त्याने हे तिनही षटकार खेचले. या ३ षटकारांसह रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा फलंदाज बनला आहे. त्याने ४७७ षटाकारांचा आकडा गाठला आहे. रोहितचे कसोटी क्रिकेटमध्ये ६४, वनडे क्रिकेटमध्ये २५० आणि टी२० क्रिकेटमध्ये १६३ असे मिळून ४७७ षटकार झाले आहेत.
यासह त्याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू आफ्रिदीला (Shahid Afridi) मागे सोडले आहे. आफ्रिदीच्या खात्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७६ षटकारांची नोंद आहे. आता रोहितच्या पुढे फक्त वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५३ षटकार (Most Sixes In International Cricket) आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
५५३ – ख्रिस गेल
४७७ – रोहित शर्मा
४७६- शाहिद आफ्रिदी
३९८ – ब्रेंडन मॅक्युलम
३७९ – मार्टिन गप्टिल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शॉकिंग! नको त्या जागी चेंडू लागला आणि क्रिकेटपटूचा मैदानातच जीव गेला
भारतासाठी सोपा नसेल CWGचा अंतिम सामना, ऑस्ट्रेलियाकडून २ वर्षांपूर्वी मिळालेली भळभळती जखम
पुन्हा एकदा चक दे! भारतीय हॉकी संघही फायनलमध्ये; गोल्ड मेडलसाठी ठोकणार दावेदारी