मुंबई इंडियन्स संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून लीग स्टेजमधील त्यांचा शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळवला गेला. या सामन्यात सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर (Rohit Sharma) होत्या, कारण मागच्या सामन्यात त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही ‘हिटमॅन’ची बॅट शांतच राहिली आणि त्याच्या नावावर आयपीएल इतिहासातील एक लाजीरवाणा विक्रम नोंदवला गेला. राजस्थानविरुद्ध झालेल्या एका चुकीमुळे तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्य (0) धावांवर बाद होणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासात भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक वेळा शून्य धावांवर बाद होण्याचा नकोसा विक्रम दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांच्या नावावर संयुक्तपणे होता. हे दोघेही आयपीएलमध्ये प्रत्येकी 18 वेळा शून्यावर बाद झाले होते. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात रोहित शर्मा पुन्हा शून्यावर बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर शॉट मारण्याच्या प्रयत्नात रोहित स्लिपमध्ये कॅच देऊन बसला. याचसोबत, तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज बनला आहे. रोहित बिना खाते उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही 19 वी वेळ होती.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले खेळाडू
19 वेळा – ग्लेन मॅक्सवेल
19 वेळा – रोहित शर्मा
18 वेळा – दिनेश कार्तिक
18 वेळा – सुनील नरीन
16 वेळा – पीयूष चावला
16 वेळा – रशीद खान
रोहित शर्माने आयपीएल 2026 ची सुरुवात धडाकेबाज पद्धतीने करत अर्धशतक झळकावले होते. पण मध्यंतरी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे (Hamstring Injury) त्याला संघाबाहेर राहावे लागले आणि त्याचे 5 सामने हुकले. रोहित शर्माने आयपीएल 2026 मध्ये एकूण 9 सामने खेळले, ज्यात त्याने 35.37 च्या सरासरीने 283 धावा केल्या. या स्पर्धेत रोहितने 157.22 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आणि एकूण 2 अर्धशतके ठोकली. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत रोहितसाठी हा आयपीएल हंगाम सर्वाधिक निराशाजनक ठरला आहे.





