नुकतीच भारतीय संघाची टी२० विश्वचषकासाठी घोषणा झाली आहे. बऱ्याच खेळाडूंच्या निवडीवर क्रिकेट चाहत्यांनी प्रश्नही उपस्थित केले होते. अष्टपैलू हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करू शकला नव्हता, पण आता भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने चांगले संकेत दिले आहेत. रोहित शर्माने आशा व्यक्त केली आहे की, हार्दिक पंड्या पुढील आठवड्यात टी२० विश्वचषकापूर्वी गोलंदाजीला सुरुवात करेल.
रोहितने आयपीएलमधील मुंबईच्या शेवटच्या सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘त्याच्या गोलंदाजीवर फिजिओ आणि प्रशिक्षक काम करत आहेत. त्याने अजून एकही चेंडू टाकलेला नाही. एकावेळी एक सामना लक्षात घेऊन आम्हाला त्याच्या फिटनेसचे आकलन करायचे होते. दिवसेंदिवस त्यात सुधारणा होत आहे. कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत तो गोलंदाजी सुरू करू शकेल. फक्त डॉक्टर आणि फिजिओच याबद्दल सांगू शकतात.’
पंड्याने फलंदाजीतही खूप निराशा केली आहे. त्याने आयपीएल २०२१ मध्ये केवळ १२७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १४.११ तर स्ट्राइक रेट ११३.३९ होता. रोहित म्हणाला, ‘जोपर्यंत त्याच्या फलंदाजीचा प्रश्न आहे, तो थोडा निराश असेल, पण तो एक चांगला खेळाडू आहे. तो यापूर्वीही कठीण परिस्थितीतून बाहेर आला आहे. तो त्याच्या फलंदाजीवर खूश असणार नाही, पण संघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. मला स्वतःला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे.
रोहितला मुंबई इंडियन्स संघातील भारतीय खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चिंता वाटत नाही, कारण त्याच्या मते, टी२० विश्वचषक ही एक वेगळी स्पर्धा असेल जिथे एखादा खेळाडू सरावाच्या वेळीही लयमध्ये परत येऊ शकतो. रोहित पुढे म्हणाला, ‘आयपीएलमध्ये काय घडले आणि टी२० विश्वचषकात काय होणार आहे, यावर मी जास्त लक्ष केंद्रित करू इच्छित नाही. टी२० विश्वचषक ही एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा आहे आणि फ्रँचायझी क्रिकेट त्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही या पैलूंकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही. फॉर्म महत्त्वाचा आहे. पण दोन्ही ठिकाणी संघ वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही त्यावर जास्त लक्ष केंद्रित करू शकत नाही.’
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार मनीष पांडेनेही लढवली धोनीसारखीच युक्ती अन् पोलार्डची मिळवली विकेट, पाहा व्हिडिओ
टी२० विश्वचषक तोंडावर असताना पाकिस्तान संघात ३ मोठे बदल, एक खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर