भारत विरुद्ध श्रीलंका संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) भिडणार आहेत. हा विश्वचषक 2023 स्पर्धेतील 33वा सामना आहे. या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी येण्याचा प्रयत्न करेल. अशात या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने मोठे विधान केले आहे. त्याने आपल्या विधानातून विरोधी संघाला चेतावणी दिली आहे. त्याने म्हटले की, तो खेळपट्टीवर जाऊन कोणताही विचार न करता बॅट फिरवत नाहीये. रोहित शानदार फॉर्ममध्ये आहे. तसेच, स्पर्धेत भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे.
रोहितचे विधान
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सामन्याच्या एक दिवस आधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने आपल्या फलंदाजीविषयी बोलताना म्हटले की, “निश्चितच परिस्थिती माझ्या डोक्यात असतात, पण सध्या मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेत आहे. मी कोणत्याही खेळपट्टीवर जाऊन बॅट अशीच फिरवत नाही. मला माहिती आहे की, बॅटचा वापर कसा करायचा आहे. सुरुवातीला मला चांगली फलंदाजी करत संघाला योग्य स्थितीत आणायचे असते. या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात सुरू असतात आणि मी हा विचार करूनच फलंदाजी करतो.”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, “मला डावाची लय ठरवावी लागते. कारण, जेव्हा मी फलंदाजी करण्यासाठी येतो, तेव्हा धावसंख्या शून्य असते आणि माझ्यावर विकेट पडण्याचा कोणताही दबाव नसतो. जेव्हा तुम्ही डावाची सुरुवात करता, तेव्हा तुमच्यावर दबाव नसतो आणि तुम्ही मोकळेपणाने शॉट मारू शकता. मात्र, जेव्हा पॉवरप्लेममध्ये विकेट पडते, तेव्हा संघ दबावात येतो.”
रोहित जबरदस्त फॉर्ममध्ये
विश्वचषक 2023 स्पर्धेत रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो प्रत्येक सामन्यात महत्त्वाची खेळी करताना दिसत आहे. त्याने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 66.33च्या सरासरीने 398 धावा निघाल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित सर्वाधिक धावा करणारा भारताचा अव्वल, तर स्पर्धेतील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. अशात संघाला रोहितकडून श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल. (rohit sharma statement ahead of icc odi world cup 2023 ind vs sl 33th match at wankhede stadium)
हेही वाचा-
पराभव एकाचा, नुकसान भलत्याचेच! न्यूझीलंड हारताच भारताचे Points Tableमध्ये मोठे नुकसान, बावुमासेनेची भरारी
वनडेत भारताचंच पारडं जड, वानखेडेवर श्रीलंकेला धोबीपछाड देणार का रोहितसेना? वाचा सविस्तर