कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी केवळ ६ दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. भारत आणि न्यूझीलंड या ऐतिहासिक सामन्यात एकमेकांशी भिडतील. एजबॅस्टनच्या रोज बाऊल मैदानावर १८ ते २२ जून दरम्यान हा सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा मैदानावर उतरताच एक असा विक्रम करेल जो जागतिक क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूला जमलेला नाही.
रोहित बनणार ही कामगिरी करणारा पहिला खेळाडू
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याचे खेळणे नक्की आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर रोहितच्या नावे एक असा विक्रम नोंदवला जाईल जो क्रिकेटच्या १४४ वर्षांच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही खेळाडूने केला नाही.
जर भारतीय संघाने कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जिंकला, तर रोहित आयसीसीच्या तिन्ही प्रकारच्या स्पर्धांचा चषक उंचावणारा पहिला खेळाडू ठरेल. रोहितने २००७ ते २०१३ या काळात सन २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारताने तो पहिलावहिला टी२० चषक जिंकला होता. त्यानंतर, वनडे प्रकारातील २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात देखील तो खेळलेला आणि भारताने ती ट्रॉफीही जिंकली होती.
आता रोहित कसोटी क्रिकेटमधील एकमेव आयसीसी स्पर्धा असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकत आयसीसी टी२० विश्वचषक, कसोटी चॅम्पियनशीप व आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकणारा आजपर्यंतचा पहिला खेळाडू ठरणार आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहितची कामगिरी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्रथमच आयोजित केलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपला जुले २०१९ मध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेत रोहित शर्माने आतापर्यंत ११ सामने खेळताना १७ डावांमध्ये ६४.३७ च्या लाजवाब सरासरीने १०३० धावा बनविल्या आहेत. यामध्ये चार शतके व दोन अर्धशतकांचा समावेश आहे. स्पर्धेत अजिंक्य रहाणेनंतर भारताकडून तो सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरतो. अंतिम सामन्यात देखील भारतीय संघाला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल १०१ च्या सरासरीने धावा फटकावणारा WTC Final मध्ये ठरू शकतो भारतासाठी डोकेदुखी
भारतीय संघ खेळतोय आपापसात सराव सामना, पहिल्या दिवशी ‘या’ खेळाडूंनी दाखवली चमक
व्हिडिओ: WTC फायनलसाठी कोहलीची ‘विराट’ तयारी, ‘या’ फटक्यांचा करतोय खास सराव