जवळपास मागील दीड वर्षांपासून भारत देश कोविड-१९ महामारीचा सामना करत आहे. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला आहे. परंतु अशा कठीण काळात मोठमोठे सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूंनी पीएम किंवा सीएम फंडमध्ये मोठ्या देणगी दिल्या आहेत. अशात भारताचा गोलंदाज एस श्रीसंत याने सर्वांना मोठा सल्ला दिला आहे.
दान करण्यापुर्वी आपल्या आजूबाजूला कोणी गरजू व्यक्ती आहे का नाही याकडे एकदा लक्ष देण्यास श्रीसंतने सांगितले आहे.
आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिले आहे की, ‘पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी देण्यापुर्वी स्वत:च्या आजूबाजूला एकदा पाहा. तुमचा कोणता नातेवाईक, मित्र, नोकर किंवा इतर कोणती व्यक्ती कोरोनाविरोधी लढ्यात आर्थिकदृष्ट्या कमजोर तर पडला नाहीया ना. इकडे दान करण्यापुर्वी त्यांना मजबूत स्थितीत आणा. कारण तुम्हीच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नव्हे.’
https://www.instagram.com/p/COcf2TSMqBn/?igshid=1to19nidlwplw
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आतापर्यंत बऱ्याच भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूंनी मदतीचा हात पुढे केला आहे. नुकतीच उदाहरणे घ्यायची झाली तर, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने हेमकुंट फाऊंडेशनला दान करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यातून कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरसह बेड्स, कोविड रिलिफ किट्स आणि इतर आवश्यक वस्तू पोहचवण्यात मदत होईल. तसेच यातून विशेषत: भारतातील ग्रामीण आणि लहान शहरी भागात मदत करण्याची इच्छा रिषभने व्यक्त केली आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आशियातील सर्वात मोठी विश्वसनीय संस्था केट्टोसोबत मिळून देणगी जमा करण्यासाठी एक मोहिम सुरू केली आहे. यामध्ये सुरुवातीला त्यांनी २ कोटींची देणगी दिली आहे. त्यानंतर अनेकांनी पुढाकार घेत मदत केली आहे. त्यानंतर पुढील २४ तासात या मोहिमेअंतर्गत तब्बल ३.६ कोटी रुपये जमा झाले आहेत.
विरुष्का आणि पंतप्रमाणे अजिंक्य रहाणे, सचिन तेंडूलकर अशा बऱ्याचशा भारतीय क्रिकेटपटूंनी कोरोनापिडीतांची मदत केली आहे. पॅट कमिन्स, जेसन बेहरनडॉर्फ, ब्रेट ली अशी परदेशी क्रिकेटपटूंनीही भारतवासीयांना कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘लस घेतली हो’; ३३ वर्षीय उमेश यादवने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, देशवासीयांना केले आवाहन