पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पाकिस्तानी गोलंदाजांकडून जबरदस्त खेळ बघायला मिळत आहे. रावलपिंडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तानी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज हसन अलीच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 201 धावांवर आटोपला.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला आपल्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 201 धावांवर रोखला. पाकिस्तान कडून हसन अलीने शानदार कामगिरी केली. हसनने 15.4 षटकात 54 धावा देत 5 बळी मिळवले. पाकिस्तानने पहिल्या डावात 272 धावा बनवलेल्या असल्याने त्यांना 71 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली आहे.
दरम्यान पाकिस्तानचा दुसरा डाव देखील लडखडला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानच्या ६ बाद १२९ धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार कामगिरी केली. पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला त्यांनी खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी दिली नाही. जॉर्ज लिंडेने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत ९ षटकात केवळ १२ धावा देत ३ बळी घेतले आहेत.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान २८ तर हसन अली ० धावांवर खेळत आहेत. पाकिस्तानकडे एकूण २०० धावांची आघाडी असून त्यांचे ४ फलंदाज शिल्लक आहेत. सामन्याचे अजूनही २ दिवस बाकी असल्याने रंगतदार मुकाबला रंगण्याची चिन्हे आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान