भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (india tour of south africa) आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला १-२ असा पराभव मिळाला. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत देखील भारतीय संघ मागे पडला आहे. बुधवारी (१९ जानेवारी) उभय संघात पहिला कसोटी सामना खेळला गेला, ज्यामध्ये भारताला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर दक्षिण अफ्रिकेने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत एकदिवसीय मालिकेत केएल राहुल (KL Rahul) भारताचे नेतृत्व करत आहे. राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघाने काही महत्वाच्या चुका केल्या. ज्यामुळे दक्षिण अफ्रिकेने पहिला एकदिवसीय सामना जिंकला. आपण या लेखात भारतीय संघाने केल्या प्रमुख चार चुकांची माहिती घेणार आहोत.
पहिली चूक –
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात युवा अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. परंतु, सामन्यात त्याला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या सहा सामन्यांमध्ये ९ विकेट्स घेतल्या होत्या. केएल राहुलने त्याला गोलंदाजीची संधी दिली नाही, ही कर्णधाराच्या रूपातील त्याची मोठी चूक ठरली. ज्या पाच भारतीय गोलंदाजांनी सामन्यात गोलंदाजी केली, त्यापैकी तीन गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाहीत.
दुसरी चूक –
दक्षिण अफ्रिकेने फलंदाजीच्या सुरुवातीला पटापट विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसले. डावाच्या १८ षटकात दक्षिण अफ्रिकेने तीन विकेट्स गमावल्या होत्या. परंतु, त्यानंतर फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. भारतीय गोलंदाजांना तिसऱ्या विकेटनंतर चौथ्या विकेटसाठी पुढची ३० षटके गोलंदाजी करावी लागली. टेंबा बवुमा आणि रासी वॅन डर ड्यूसेन यांनी शतके ठोकली. तर, द्विशतकी भागीदारी देखील केली. भारतीय गोलंदाजांना या दोघा फलंदाजांची विकेट लवकर घेता न आल्यामुळे दक्षिण अफ्रिकेने २९६ धावा केल्या.
तिसरी चूक –
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (bhuvneshwar kumar) याने या सामन्यातून संघात पुनरागमन केले. भुवनेश्ववरकडून सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेटची आपेक्षा होती. मात्र, तो या अपेक्षेला पात्र ठरू शकला नाही. तसेच, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल देखील विकेट घेऊ शकला नाही. त्याव्यतिरिक्त शार्दुल ठाकुर संघासाठी खूप महागात पडला आणि विकेट देखील घेऊ शकला नाही. शार्दुलने नंतर फलंदाजीच मात्र काही प्रमाणात योगदान नक्कीच दिले.
चौथी चूक –
भारतीय संघासाठी वरच्या फळीतील शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (virat kohli) यांनी डावाची चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनीही अर्धशतकी खेली केली. अशात भारताने एका विकेटच्या नुकसानावर १३८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकला नाही. पुढच्या ५० धावा करताना भारतीय संघाने ५ विकेट्स गमावल्या.