सेंच्यूरियन। पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात सध्या टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना पाकिस्तानने बुधवारी (१४ एप्रिल) ९ विकेट्सने जिंकून २-१ अशी आघाडी घेतली आहे. पाकिस्तानच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार बाबर आझम.
तिसऱ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला विजयासाठी २०४ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी दमदार सुरुवात केली. त्यांनी सलामीला तब्बल १९७ धावांची भागीदारी रचली. त्यांची ही भागीदारी तोडण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी खूप प्रयत्न केला. अखेर १८ व्या षटकात लिझाद विल्यम्सला यश आले आणि त्याने आक्रमक खेळणाऱ्या बाबर आझमला बाद केले. आझमने ५९ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांसह १२२ धावांची खेळी केली.
तो बाद झाल्यानंतर रिझवानने फखर जमानला साथीला घेत पाकिस्तानला १८ षटकांतच २०५ धावांवर पोहचवत विजय साकारुन दिला. रिझवानने ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७३ धावा केल्या. तसेच जमान ८ धावावंर नाबाद राहिला.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करतानाचा पहिलाच विजय आहे.
तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २०३ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून जानेमन मलान (५५) आणि एडेन मार्करम (६३) यांनी अर्धशतके ठोकली. तर रस्सी वॅन डर दसन (३४*). हेन्रिच क्लासेन (१५) जॉर्ज लिंड(२२) आणि अँडील फेहलुक्वायो (११) यांनी छोटेखानी पण आक्रमक खेळी केल्या.
पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच शाहिन आफ्रिदी, हसन अली आणि फाहिम अश्रफ यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
बाबर आझम वनडेत अव्वल क्रमांकावर
बुधवारी दिवसाच्या सुरुवातीलाच बाबर आझमला आनंदाची बातमी मिळाली होती. आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीनुसार आझमने फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला. त्याने १२५८ दिवसांपासून आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या विराटला मागे टाकत हा अव्वल क्रमांक मिळवला आहे.
तसेच आयसीसी वनडे क्रमवारीत प्रथम स्थान गाठणारा पाकिस्तानचा बाबर आझम चौथा फलंदाज आहे. यापूर्वी, झहीर अब्बास (१९८३-१९८४), जावेद मियांदाद (१९८८-१९८९) व मोहम्मद युसुफ (२००३) हे पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या पहिल्या स्थानावर पोहोचले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
पांडेजींची कमाल! सूर मारत टिपला वॉशिंग्टन सुंदरचा लाजवाब झेल, पाहा व्हिडिओ
मला राग येतोय! आऊट होऊन मैदानातून बाहेर जाताना विराटचा चढला पारा, मग केले असे काही; व्हिडिओ व्हायरल
रोहित शर्माबद्दल ‘तसं’ ट्वीट करणे स्वीगीला पडले महागात; मागावी लागली चाहत्यांची माफी