आठवतंय का? आजच्याच दिवशी ३६ वर्षांच्या सचिन तेंडूलकरने क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास

10 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी 2010 ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वनडेमध्ये पहिलेच द्विशतक करण्याचा इतिहास रचला. यानंतर रोहित शर्मा, ख्रिस गेल, विरेंद्र सेहवाग, मार्टिन गप्टिल आणि फखर जमान यांनी वनडेत द्विशतक रचण्याचा कारनामा केला, पण याचा पाया रचला तो सचिनने.

2010 ला दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. यावेळी 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरी सुटली. त्यानंतर 21 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. याच वनडे मालिकेतील ग्वाल्हेरला झालेल्या दुसऱ्या सामन्यात सचिनने ऐतिहासिक द्विशतकी खेळी केली.

या सामन्यात भारताचा कर्णधार असलेल्या एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलामीला भारताकडून सचिन आणि विरेंद्र सेहवाग यांची जोडी फलंदाजीला उतरली. परंतू चौथ्याच षटकात सेहवाग वेन पार्नेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.

त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर 24 वर्षांचा दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. त्याने चांगल्या लयीत खेळणाऱ्या सचिनला साथ देण्यास सुरुवात केली. सचिनने दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन, पार्नेल, जॅक कॅलिस अशा तिखट माऱ्या समोरही कोणतीही चूक न करता धावा करण्याची आपली लय कायम ठेवली होती. सचिनने त्याचे अर्धशतक केवळ 37 चेंडूत पूर्ण केले, पुढे त्याने 90 चेंडूत त्याचे शतकाही पूर्ण केले.

विशेष म्हणजे या शतकी खेळीत त्याने एकही षटकार मारला नव्हता. त्याने त्याच्या खेळीतील पहिला षटकार मारला तो 111 धावांवर असताना.

सचिन आणि कार्तिकची जोडी मैदानावर चांगलीच जमली होती. या दोघांनी बाऊंड्रींबरोबर एकेरी दुहेरी धावांवरही लक्ष दिले. पण अखेर कार्तिक 79 धावांवर असताना पार्नेलच्याच गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यामुळे सचिन आणि त्याने दुसऱ्या विकेटसाठी केलेली 194 धावांची भागीदारीही तुटली. त्यावेळी सचिन 124 धावांवर खेळत होता.

पुढे सचिनच्या साथीला युसुफ पठाण खेळायला आला. तो 23 चेंडूत 36 धावांची तुफानी खेळी करुन बाद झाला. पण तो गोलंदाजांवर आक्रमण करत असताना एक बाजू सचिनने भक्कमपणे सांभाळली होती. पठाण बाद झाल्यानंतर धोनी फलंदाजीला आला. त्यावेळी सचिनने 160 धावसंख्या पार केली होती. तर डावाचे त्यावेळी 43 वे षटक चालू होते.

त्यानंतर मात्र 36 वर्षीय सचिनला क्रॅम्प यायला लागले. पण 20 वर्षांचा अनुभव असणाऱ्या सचिनने त्याच्यासाठी रनर घेतला नाही. यावेळी एका बाजूने धोनीने त्याचे गोलंदावरील आक्रमण सुरु केले. हळूहळू सचिननेही स्वत:चा 186 धावांच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मागे टाकला. तर  46 व्या षटकात त्याने त्यावेळी झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉवनट्री आणि पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावर असलेल्या 194 धावांच्या वनडेतील सर्वोच्च वयक्तिक धावांच्या विक्रमालाही मागे टाकले.

त्यामुळे प्रेक्षकांची आणि सचिनच्या चाहत्यांचीही उत्सुकता वाढली. सचिनला 200 धावा करण्याची संधी समोर होती. यावेळी एकीकडे धोनीची फटकेबाजी सुरुच होती. त्यानेही त्यावेळी सचिनबरोबर नाबाद 101 धावांची भागादारी केली होती. त्या सामन्यात धोनी 35 चेंडूत 68 धावांवर नाबाद होता.

भारताच्या डावात 50 व्या षटकात धोनी स्ट्राईकवर होता, त्यावेळी सचिन 199 धावांवर नाबाद होता. त्यामुळे सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. अनेकांना धोनी 1 धाव करुन सचिनला स्ट्राईक देईल अशी आशा होती. पण पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार खेचला. तर पुढच्या चेंडूवर त्याने 1 धाव घेत सचिनला स्ट्राईक दिली.

अखेर सर्वांना प्रतिक्षा असलेला तो क्षण आला सचिनने 50 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली आणि वनडेतील पहिले द्विशतक साजरे करत इतिहास रचला. त्यावेळी तो वनडे क्रिकेटमध्ये 200 धावांची खेळी करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला होता. तर एकूण दुसरा क्रिकेटपटू ठरला होता. त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क ही वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी विश्वातील पहिली फलंदाज होती.

सचिनने हे द्विशतक त्याच्या नेहमीच्या शैलीत हेल्मेट काढून ते हेल्मेट हातात घेऊन आणि बॅट उंचावत आकाशाकडे बघत साजरे केले. यावेळी सर्वजणांनी त्याला टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. त्याने त्यावेळी 147 चेंडूत 25 चौकार आणि 3 षटकार मारत नाबाद 200 धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे भारताने 401 धावांचा डोंगर उभा केला आणि आफ्रिकेला 402 धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 42.2 षटकात 248 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना तब्बल 153 धावांनी जिंकला. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून केवळ एबी डिविलियर्सने एकाकी झुंज देताना 101 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 114 धावांची खेळी केली होती. तर भारताकडून गोलंदाजी करताना श्रीसंतने सर्वाधिक 3 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली होती. आशिष नेहरा, युसुफ पठाण आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेत मोलाचे योगदान दिले होते.

 

You might also like