‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखला जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीत अनेक सन्मान आणि पुरस्कार मिळवले आहेत. यामध्ये आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. यावेळी सचिनला ऑस्ट्रेलियात एका विशेष सन्मानानं गौरविण्यात आलं.
वास्तविक, सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट क्लब म्हणजेच MCC या क्रिकेटच्या सर्वात प्रतिष्ठित संस्थेचं मानद सदस्यत्व मिळालं आहे. तो आता या क्लबकडून मानद सदस्यत्व मिळवणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी एक बनला आहे. MCC ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेची स्थापना 1838 मध्ये झाली होती. या क्लबकडून हा सन्मान मिळणे ही केवळ सचिनसाठीच नाही तर प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी मोठी बाब आहे.
मेलबर्न क्रिकेट क्लबनं ही माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केली. त्यांनी लिहिलं, “एका आयकॉनचा सन्मान. MCC ला हे जाहीर करताना आनंद होत आहे की माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं खेळातील त्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल मानद क्रिकेट सदस्यत्व स्वीकारलं आहे.”
तसं पाहिलं तर, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड जबरदस्त राहिला आहे. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला हा सन्मान मिळाला. याआधीही या महान भारतीय फलंदाजाला ऑस्ट्रेलियात विशेष सन्मान मिळाला होता. 2012 मध्ये मास्टर ब्लास्टरला ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
मेलबर्नच्या एमसीजी मैदानावर सचिन तेंडुलकरने 5 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं सुमारे 45 च्या सरासरीनं 449 धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या नावे 1 शतक आणि 3 अर्धशतकं आहेत. या मैदानावर तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
हेही वाचा –
मोहम्मद सिराजला ‘ड्रॉप’ करा, दिग्गज क्रिकेटपटू लाईव्ह मॅचदरम्यान संतापले!
टीम इंडियाची कमाल कामगिरी! वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश
बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी विराटची छेड काढली, संतापलेल्या कोहलीचा व्हिडिओ व्हायरल