भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने अनेक मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकेच नव्हे तर, १०० शतकं झळकावण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. तरीदेखील माजी भारतीय दिग्गज खेळाडूने सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीतील कमतरता शोधून काढली आहे.
सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहण्यासाठी कोट्यवधी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु, विक्रमांचे विक्रम करणाऱ्या या फलंदाजाच्या फलंदाजीमधील कमतरतेबाबत दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी भाष्य केले आहे.
कपिल देव यांनी एका लाईव्ह चर्चासत्रात म्हटले होते की, सचिन तेंडुलकरला हे माहीत नव्हते की, शतक केल्यानंतर त्याचे २०० आणि ३०० धावांमध्ये कसे रूपांतर करायचे आहे. त्यांनी भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यु वी रमन यांच्यासोबत झालेल्या चर्चा सत्रात म्हटले होते की, सचिन सारखं टॅलेंट त्यांनी कधीच पाहिलं नाही. परंतु, तो निडर फलंदाज नव्हता. (Sachin Tendulkar knew how to score hundreds but didn’t know how to convert those into 200s &300s, Said Kapil Dev)
सचिनला हे जमत नव्हते
कपिल देव म्हणाले की,” त्याला शतक कसे करायचे, हे माहीत होते. परंतु, त्या शतकाचे २०० आणि ३०० धावांमध्ये कसे रूपांतर करावे हे त्याला माहीत नव्हते. सचिन तेंडुलकरसारख्या फलंदाजाने आपल्या कारकीर्दीत कमीत कमी ३ तिहेरी शतकं झळकवायला हवे होते, तर किमान १० दुहेरी शतक तरी झळकवायला हवे होते. कारण, सचिन तेंडुलकर सारखा फलंदाज फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना प्रत्येक षटकात किमान एक तरी चौकार मारण्याची क्षमता ठेवायचा.”
निडर फलंदाज नव्हता सचिन तेंडुलकर
तसेच कपिल देव पुढे म्हणाले की, “सचिन शतक झळकावल्यानंतर एक-एक धाव घ्यायला सुरुवात करायचा. जिथे त्याला शतक केल्यानंतर आक्रमक फलंदाजी करण्याची आवश्यकता होती.”
सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांच्यात २००० मध्ये चांगलाच वाद रंगला होता. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकर होता तर कपिल देव हे भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत होते.
महत्वाच्या बातम्या-
‘मी लोकांना खूश करण्यासाठी खेळत नाही,’ कर्णधार मितालीची टिकाकारांना सणसणीत चपराक
इंग्लंडच्या भूमित पराभूत होऊनही विराटसेना यजमानांवर करेल मात; बड्या खेळाडूने सांगितले कारण
कौतुक तर होणारच! लहाण्या अपंग चाहत्याला आझमकडून भरभरुन प्रेम, दिला ‘असा’ प्रतिसाद