मुंबई । गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्याला घडवणाऱ्या गुरूंसाठी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने त्याची कारकीर्द घडविण्यामध्ये तीन गुरूंचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यामुळेच सचिनचे जीवन बदलले.
‘मास्टर ब्लास्टर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट फॅन्सबरोबर ते तीन गुरू कोण आहेत याचा खुलासा केला. ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने सांगितले की, ” उठता बसता माझ्या डोक्यात तीन जणांचे नाव नेहमी असते. जे की मला गुरू समान आहेत. माझ्या आयुष्यात या तिघांचा खास प्रभाव आहे.”
सचिन तेंडुलकरने तीन गुरूंपैकी पहिला गुरू त्याचा भाऊ अजित तेंडुलकर असल्याचे सांगितले. “अजित तेंडुलकर यांनीच पहिल्यांदा रमाकांत आचरेकर यांच्याकडे घेऊन गेले. माझा भाऊ क्रिकेट सामन्यात माझ्याजवळ नसताना देखील मी फलंदाजी करताना तो माझ्या नेहमीच आसपास असतो, असा मला भास होतो. मला नेहमी वाटते की मी माझ्या भावासोबतच फलंदाजी करत आहे,” असे सचिनने सांगितले.
रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकरचे दुसरे गुरू आहेत. फलंदाजीचे धडे आचरेकरांनी सचिन तेंडुलकरला दिले होते. “आचरेकर सरांविषयी मी काय बोलू शकतो. ते फलंदाजीचा सराव करत असताना तासनतास माझ्याजवळ असायचे. मॅच असो अथवा नेट प्रॅक्टिस आचरेकर सर सतत माझ्या चुका नोट करून घ्यायच्या आणि मला सुधार करण्यास सांगायचे. ते तासनतास क्रिकेटविषयी माझ्याबरोबर गप्पा मारायचे.”
“माझे वडील माझे तिसरे गुरू आहेत. ज्यानी मला आयुष्याचा धडा शिकवला. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ न वापरण्याचा सल्ला दिला. कष्ट करून ती गोष्ट मिळण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. या तीन गुरूंविषयी मी जितके बोलावे तितके कमीच आहे,” असे सचिन तेंडुलकर म्हणाला.