न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला विश्वचषकात भारतीय संघाने चांगली सुरुवात केली आहे. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक अभियानाची सुरुवात केली आणि भारताने यामध्ये विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय खेळाडू पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफच्या मुलीसोबत खेळताना दिसल्या. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने या भावनिक प्रसंगाची दखल घेतली आहे.
विश्वचषक स्पर्धेत (ICC Women’s World Cup 2022) ३० वर्षांची बिस्माह मारूफ (Bismah Maroof) पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे. मारूफ पाकिस्तानची एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. तिने पाकिस्तानसाठी १०९ एकदिवसीय आणि १०८ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. मागच्या वर्षी तिने ३० ऑगस्ट रोजी मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर काही महिने तिला क्रिकेटच्या मैदानातून दूर रहावे लागले होते. पण विश्वचषक स्पर्धेसाठी ती पुन्हा सज्ज झाली आहे. विश्वचषक दौऱ्यावर मारूफसोबत तिची लहान मुलगीही आली आहे.
मारूफच्या मुलीविषयी प्रत्येकालाच उत्सुकता लागून आहे. अशात भारतीय महिला संघाच्या खेळाडू मागे कशा राहणार. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मारूफ आणि तिच्या लहान मुलीला घेरा घातला. सर्व खेळाडू त्या लहान बाळासोबत खेळताना आणि बोलण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. या प्रसंगाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आता भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही खेळाडूंमधील या एकोप्याचे कौतुक केले आहे. स्वतःच्या अधिकृत खात्यावरून सचिनने ट्वीट करून लिहिले की, “किती सुंदर क्षण आहे ! क्रिकेटच्या मैदानावर सीमा असतात, पण त्या मैदानाबाहेर मोडल्या जातात. खेळ एकत्र आणतो !”
What a lovely moment! Cricket has boundaries on the field, but it breaks them all off the field.
Sport unites!#CWC22 pic.twitter.com/isgALYeZe1
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 6, 2022
दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. मर्यादित ५० षटकांमध्ये भारतीय संघाने ७ विकेट्सच्या नुकसनावर २४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ ४३ षटकांमध्ये आणि अवघ्या १३७ धावांवर सर्वबाद झाला. परिणामी भारातने १०७ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाला विश्वचषकातील त्यांचा पुढचा सामना ८ मार्चला यजमान न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर श्रीलंकेला मोठे नुकसान, गमावले WTC गुणतालिकेतील पहिले स्थान
कर्नाटकचा ‘हा’ युवा फलंदाज ठोठावतोय टीम इंडियाचं दार, गेल्या २ वर्षांपासून आहे तुफान फॉर्ममध्ये
कर्णधार रोहित शर्माने खांद्यावर घेतली मोठी जबाबदारी! म्हणाला, ‘विजयापेक्षा संघात बेंच स्ट्रेंथ…’