भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची बातमी माध्यमांद्वारे समोर आली होती. त्याच्या जागी वनडे व टी२० संघाचा कर्णधार म्हणून अनुभवी सलामीवीर रोहित शर्माला कर्णधारपद देण्यात येईल असे म्हटले जात होते. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) या वृत्ताचे खंडन केले गेले. त्याचवेळी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने विराट कोहलीसोबत घाणेरडे राजकारण केले जात असल्याचा आरोप लावला.
विराटसोबत होतेय राजकारण
पाकिस्तानचा माजी कर्णधार व क्रिकेट समीक्षक सलमान बट याने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना भारतीय कर्णधारांच्या अदलाबदलीविषयी बोलताना म्हटले,
“येत असलेल्या बातम्यांनुसार जर विराट कोहलीला कर्णधारपदावरून कमी करण्यात येत असेल तर, हे एक घाणेरडे राजकारण आहे. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केली असून, तो संघाला पुढे घेऊन जाताना दिसतोय. रोहित नक्कीच उत्कृष्ट खेळाडू आणि शानदार कर्णधार आहे मात्र, ही संघाचा कर्णधार बदलण्याची योग्य वेळ नाही.”
सोमवारी (१३ सप्टेंबर) विराट कोहली टी२० विश्वचषकानंतर भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचे नेतृत्व सोडण्याची चर्चा सुरू झाली होती. २०१७ पासून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून विराटने एकही विजेतेपद आपल्या नेतृत्वात मिळवून दिले नाही. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या व २०२१ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. तर, २०१९ वनडे विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडलेला.
बीसीसीआयने केले खंडन
सोमवारी सकाळपासूनच विराट कर्णधारपद सोडणार असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. त्यानंतर बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमल यांनी या सर्व बातम्यांचे खंडन केले. भारतीय संघाचे कर्णधारपद विभागण्यात येणार असल्याची कोणतीही चर्चा झाली नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे, सायंकाळी या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.