पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकला. त्यामुळे १-१ अशी बरोबरी झाली आहे. मात्र या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
झाले असे की भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या फलंदाजी करत असताना त्याचे इंग्लंडचा क्रिकेटपटू सॅम करन बरोबर वाद झाल्याचे दिसून आले. त्यांच्यातील वाद पंचांना मिटवावे लागले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ही घटना भारतीय संघ फलंदाजी करत असताना ४६ व्या षटकात घडली. या षटकात सॅम करन गोलंदाजी करत होता. तर भारताकडून रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या फलंदाजी करत होते. या षटकात पंड्याने २ षटकार मारले होते. त्याला षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पण मोठा फटका मारायचा होता. पण त्याला तो मारता आला नाही. पण हा चेंडू टाकून झाल्यानंतर सॅम करत काहीतरी बोलला. ते ऐकून पंड्या त्याच्यामागे धावला आणि त्याच्याशी बोलायला लागला. त्यांच्यातील वाद वाढलेला पाहून पंच मध्ये पडले आणि त्यांनी या दोघांना वेगळे केले. अखेर पंड्या १६ चेंडूत ३५ धावा करुन शेवटच्या षटकात बाद झाला.
https://twitter.com/CowCorner9/status/1375409707146338314
इंग्लंडने मिळवला विजय –
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. भारतीय संघानेही याचा फायदा घेत ५० षटकात ६ बाद ३३६ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३३७ धावांचे आव्हान दिले. भारताकडून केएल राहुलने १०८ धावांची शतकी खेळी केली. तर रिषभ पंतने ७ षटकारांसह आक्रमक ७७ धावांची खेळी केली. तसेच कर्णधार विराट कोहलीने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडकडून रिस टोप्ली आणि टॉम करनने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल ३३७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने ११० धावांची भागीदारी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. जेसन रॉय ५५ धावांवर बाद झाला.
त्याच्यानंतर बेअरस्टोला बेन स्टोक्सने शानदार साथ दिली. स्टोक्स आणि बेअरस्टोमध्ये दुसऱ्या विकेटसाठी १७५ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने इंग्लंडचा विजयाचा मार्ग सोपा केला. स्टोक्स ९९ धावांवर बाद झाल्याने ही भागीदारी तुटली. त्याच्यापाठोपाठ बेअरस्टो १२४ धावा करुन बाद झाला. पण तो पर्यंत इंग्लंडसाठी विजय दृष्टीक्षेपात आला होता.
अखेर डेव्हिड मलानने नाबाद १६ आणि लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद २७ धावाकरत इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
दुर्दैवी बेन स्टोक्स, अवघ्या एका धावेने हुकले वनडे शतक; नकोशा यादीत झाला समावेश
भारताला गेल्या ४० दिवसात मिळाले पाच चमकदार खेळाडू, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात केली दमदार कामगिरी
शतक सोडा स्टोक्स अर्धशतकाच्याही नजीक गेला नसता, पंचांचा ‘तो’ निर्णय बरोबर का चूक? तुम्हीच ठरवा