मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील दुसरा सामना शनिवारी, १० एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना दिल्लीने ७ विकेट्सने जिंकला. असे असले तरी या सामन्यात चर्चेचा विषय ठरली ती करन बंधूंची जोडी.
या सामन्यातून करन बंधूंपैकी जेष्ठ असलेल्या टॉमने दिल्लीकडून पदार्पण केले. तर धाकटा बंधू सॅम हा गेल्या हंगामापासून चेन्नई संघाचा भाग असल्याने तो चेन्नईकडून खेळत होता. त्यामुळे हे दोन बंधू शनिवारी आमने-सामने होते.
सॅमने केली टॉमची धूलाई
या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. त्यांनी चेन्नईच्या सलामीवीरांना झटपट बाद करत सुरुवातही चांगली केली. मात्र, नंतर सुरेश रैनाने ५४, मोईन अलीने ३६ आणि अंबाती रायडूने २३ धावांच्या खेळी करत चेन्नईचा डाव सावरला. अखेरच्या ४ षटकांत सॅम करन आणि रविंद्र जडेजाने आक्रमक खेळ करत ४५ धावा वसूल केल्या. यात सॅमने १५ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३४ धावा केल्या. तर जडेजाने १७ चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.
सॅमने केलेल्या ३४ धावांमधील १७ धावा मोठा भाऊ टॉम विरुद्धच्या एकाच षटकात चोपल्या. झाले असे की डावातील १९ वे षटक टाकण्यासाठी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने टॉमकडे चेंडू सोपवला.
टॉमच्या या षटकात पहिल्या चेंडूवर रविंद्र जडेजाने चौकार ठोकला, तर पुढच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. यानंतर सॅम स्ट्राईकवर आला. टॉमने पुढचा चेंडू वाईड टाकला. त्यानंतर सॅमने टॉमच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर खणखणीत सलग दोन षटकार ठोकले. तर पाचव्या चेंडूवर चौकार वसूल केला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर १ धाव घेतली. या षटकात जडेजा आणि सॅमने मिळून एकूण २३ धावा चोपल्या.
त्यापूर्वी टॉमने डावातील १७ व्या षटकातही गोलंदाजी केली होती. या षटकातही सॅमने एका चौकारासह ५ धावा काढल्या होत्या. म्हणजेच सॅमने टॉम विरुद्ध या सामन्यात ७ चेंडू खेळताना एकूण २२ धावा काढल्या.
अखेरच्या काही षटकांत सॅम आणि जडेजा यांनी केलेल्या आक्रमक खेळामुळे चेन्नईने १८८ धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीकडून आवेश खान आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर टॉम करन आणि आर् अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिल्लीने केले आव्हान पूर्ण
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या दिल्लीकडून १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी वैयक्तिक अर्धशतके करताना १३८ धावांची सलामी भागीदारी रचली. शिखर धवनने ५४ चेंडूत ८५ धावांची खेळी केली तर पृथ्वी शॉने अवघ्या ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार लगावले.
त्यांच्या या भागीदारीनंतर रिषभ पंतने नाबाद १५ आणि मार्कस स्टॉयनिसने १४ धावा करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक २ आणि ड्वेन ब्रावोने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय
थाला-चिन्नाथाला जोडीचा मैदानावर उतरताच विक्रम, ‘अशी’ कामगिरी करणारी आयपीएलमधील एकमेव जोडी
एमएस धोनीच्या चेन्नई विरुद्ध मैदानात उतरताच ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर ‘मोठा’ विक्रम