डेहराडून: नाशिकची संजीवनी जाधव हिने महिलांच्या ५ हजार मिटर शर्यतीत रौप्य, तर पूनम सोनूने हिने कांस्यपदक जिंकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये आजचा दिवस गाजवला. याचबरोबर महिलांच्या ४०० मिटर अडथळा शर्यतीत नेहा ढाबरे हिने कांस्यपदकाची कमाई केली, तर पुरुषांच्या ४०० मिटर शर्यतीत बिद्री (कोल्हापूर) येथील रोहन कांबळे यालाही कांस्यपदक मिळाले.
गंगा ॲथलेटिक्स स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे.
संजीवनी जाधवकडून आज महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पहिल्या फेरीपासून तिने आघाडीही घेतली होती. यजमान उत्तराखंडची अंकिता आणि संजीवनी यांच्यात पहिल्या फेरीपासून पाठशिवणीचा खेळ रंगला होता. संजीवनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणार असे वाटत असताना अखेरच्या ३०० मीटरमध्ये अंकिताने मुसंडी मारत संजीवनीला मागे टाकले. अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवलेल्या दमचा वापर करीत अंकिताने १५ मिनिटे ५६.०३ सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले.
महाराष्ट्राच्या संजीवनीला १५ मिनिटे ५९.१३ सेकंद वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या पूनम सोनूने हिने १६ मिनिटे ५३.५२ सेकंद वेळ नोंदवित कांस्यपदक जिंकले. याचबरोबर महाराष्ट्राची रिंकू पवारही या लांब पल्ल्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानी राहिली. संजीवनी जाधवने सुवर्णपदकाला गवसणी घातली असती, तर महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला असता.
किरण मात्रेकडून निराशा
पुरुषांच्या ५ हजार मिटर शर्यतीत महाराष्ट्राच्या किरण मात्रे याने निराशा केली. दोन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर असलेला किरण नंतर प्रत्येक फेरीनंतर मागे पडत गेला. सहाव्या फेरीत सहाव्या स्थानापर्यंत घसरलेल्या किरणने पोटात दुखायला लागल्यामुळे अर्ध्यावरच शर्यत सोडल्याने महाराष्ट्राची पदकाची आशा संपुष्टात आली.
अडथळा शर्यतीत नेहाला कांस्य, तर रोहनला लॉटरी
महिलांच्या ४०० मिटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या नेहा ढाबळे हिने १ मिनिट ५२ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. विथया रामराज व श्रीवर्थनी एस के या तमिळनाडूच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाला गवसणी घातली. मात्र, पुरुषांच्या याच शर्यतीत महाराष्ट्राच्या किरण मात्रेला कांस्यपदकाची लॉटरी लागली. कारण सेनादलाचा निखिल भारद्वाज याने तिसरा क्रमांक मिळविला होता. मात्र, त्याला अपात्र ठरविण्यात आल्याने महाराष्ट्राच्या झोळीत अनपेक्षितपणे कांस्यपदक पडले.
महत्त्वाच्या बातम्या-
ICC ची कठोर कारवाई, शाहीन आफ्रिदीसह पाकिस्तानच्या 3 खेळाडूंना शिक्षा!
मल्लखांबमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवीची सुवर्ण हॅट्ट्रिक, रूपालीला रौप्य
ज्युदोत पुण्याच्या आदित्य परबला कांस्य