मुंबई । भारतीय वनडे संघातील यष्टिरक्षक फलंदाज एमएस धोनीने आपल्या स्वभावाने अनेकांची मने जिंकली. बर्फासारखा शांत स्वभावाचा असलेला धोनी भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दोनदा विश्वचषक जिंकला.
विरोधी संघातील खेळाडू सामना जिंकण्यासाठी स्लेजिंगचा वापर करतात. मात्र, त्याने मैदानावर कधीच आपला राग व्यक्त केला नाही. राग व्यक्त न करता शांतपणे यष्टीरक्षण करत संघाला विजय मिळवून देण्यात धोनी माहीर आहे.
धोनीच्या या स्वभावाने युवा यष्टीरक्षक संजू सॅमसन प्रभावी झाला असून धोनीचा हा गुण आत्मसात करण्याचा तो प्रयत्न करतोय. सॅमसन एका वेबसाईटशी बोलताना म्हणाला, “कठीण परिस्थितीत ही शांत राहण्याचा धोनीचा हा गुणधर्म मला आत्मसात करायचा आहे.”
तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट हा देखील काही कमी नाही. धोनीसोबतच गिलख्रिस्ट देखील यष्टिरक्षकाची परिभाषा बदलली आहे. आजचे यष्टीरक्षक चांगली फलंदाजी देखील करतात. ॲडम गिलख्रिस्ट सलामीला खेळताना आणि धोनी मधल्याफळीत खेळताना त्यांनी खेळाचे स्वरूपच बदलले.”
“सध्याच्या घडीला यष्टीरक्षक सलामीला अथवा मधल्या फळीत खेळताना संघाला उभारी देणार्या खेळीची अपेक्षा त्याच्याकडून असते. यष्टिरक्षकाची भूमिका अष्टपैलू खेळाडू सारखी असते, असेही त्याने नमूद केले.”
भारताच्या या युवा प्रतिभाशाली यष्टिरक्षक फलंदाजाचे राहुल द्रविड आणि गौतम गंभीरसारख्या दिग्गज खेळाडूंनी कौतुक केले आहे. मागील पाच वर्षात त्याने भारताकडून केवळ 4 टी20 सामने खेळले आहेत. आयपीएलच्या 93 सामन्यात त्याने 2209 धावा केल्या. तर प्रथम श्रेणीच्या 55 सामन्यात 3162 धावांची नोंद त्याच्या नावावर आहे .