संजू सॅमसनचा डबल धमाका, रोहित शर्मापेक्षाही ठोकले जलद द्विशतक

भारतात सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत केरळच्या युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने आज(12 ऑक्टोबर) गोवा विरुद्ध द्विशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रम केले आहेत.

त्याने या सामन्यात 125 चेंडूत त्याचे द्विशतक पूर्ण केले. तसेच त्याने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 10 षटकार आणि 21 चौकारांसह नाबाद 212 धावा केल्या.

सॅमसन अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक ठोकणारा भारतीय ठरला आहे. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक ठोकणाऱ्या एकूण फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड असून त्याने 120 चेंडूत अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतक केले होते.

याबरोबरच सॅमसन हा अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा भारताचा सहावा क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी भारताच्या सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्ण कौशल यांनी अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतके केली आहेत. यातील शिखर आणि कर्ण यांनी देशांतर्गत स्पर्धेत तर सचिन, सेहवाग आणि रोहितने आंतरराष्ट्रीय स्तरावर ही द्विशतके केली आहेत.

तसेच सॅमसन हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये द्विशतक करणाराही पहिला भारतीय ठरला आहे.

विशेष म्हणजे हे द्विशतक त्याचे अ दर्जाच्या क्रिकेटमधील पहिले शतकही ठरले आहे.

तसेच सॅमसनने विजय हजारे ट्रॉफीमध्येही सर्वोच्च खेळी करण्याच्या कर्ण कौशलच्या विक्रमाला धक्का दिला आहे. उत्तराखंडकडून खेळताना कर्णने सिक्कीम विरुद्ध मागीलवर्षी 202 धावा केल्या होत्या.

त्याचबरोबर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये तो सर्वोच्च खेळी करणारा यष्टीरक्षकही ठरला आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या अबीद अली यांच्या नावावर होता. त्यानी इस्लामाबादकडून खेळताना पेशावर विरुद्ध पाकिस्तानच्या नॅशनल वनडे कप स्पर्धेत नाबाद 209 धावांची खेळी केली होती.

आज विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुरु असलेल्या केरळ विरुद्ध गोवा सामन्यात सॅमसनच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर केरळने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 3 बाद 377 धावा केल्या आहेत आणि गोव्यासमोर 378 धावांचे आव्हान ठेवले आहे. केरळकडून सॅमसनबरोबरच सचिन बेबीने या सामन्यात 127 धावांची शतकी खेळी केली.

You might also like