Loading...

दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे दुसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक निमंत्रित १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर १५ सप्टेंबर २०१९ पासून प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मान्यतेखाली होणार आहे.

अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष डॉ सुधीर भाटे आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव आनंद परांजपे, पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड आणि स्पर्धेचे प्रायोजक गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजचे अनिल छाजेड यांनी सांगितले की, स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, पूना क्लब, डेक्कन जिमखाना, केडन्स, क्लब ऑफ महाराष्ट्र, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, आर्यन्स, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, अँबिशियस क्रिकेट क्लब, डीवाय पाटील क्रिकेट अकादमी, कंबाईन क्लबचा संघ आणि एमसीएने निवड केलेले महाराष्ट्रातल्या ५ झोनमधले ५ संघ (उत्तर, पश्चिम, पूर्व, मध्य आणि दक्षिण विभाग) असे एकूण १६ संघ निमंत्रित करण्यात आले आहेत.

माजी महाराष्ट्राचे कर्णधार राजू भालेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ क्लबच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीज यांनी प्रायोजित केल्याने आम्ही त्यांचे आभारी असल्याचे द्रविड यांनी सांगितले. या स्पर्धेचं वैशिष्ठ म्हणजे एकोणीस वर्षांखालील जिल्याहातील संघांना पुण्यातील क्लब मधील संघानंबरोबर खेळण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही एकमेव स्पर्धा आहे.

तसेच, ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपाची ४५ षटकांची घेण्यात येणार असून यामुळे कुमार स्तरावर अधिक चुरशीची अशी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतील सहभागी १६ संघांची चार गटात विभागणी करण्यात आली असून ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. चारही गटांमधल्या सर्वोत्तम संघाना उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.

अनिल छाजेड म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांशी जोडले जाणे हा एक आनंददायक अनुभव असतो. त्यातच जेव्हा असे उपक्रम गुणवान खेळाडूना लक्ष ठेवून केलेले असतात. पीवायसी येथे होणाऱ्या या स्पर्धेबाबतही असेच म्हणता येईल. या स्पर्धेसाठी सर्व सुविधा आणि क्रीडा साहित्य तर देणार आहोतच पण या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवान खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीत सर्वोतोपरी मदत करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेला गोल्डफिल्ड प्रॉपर्टीजला मुख्य प्रायोजकत्व म्हणून जोडले जाताना आनंद वाटत आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआयच्या वतीने १९ वर्षाखालील मुलांसाठी एकदिवसीय स्पर्धांना प्रारंभ होत असून या स्पर्धेमुळे आगामी मोसमासाठी सर्व खेळाडूंना तयारी करण्यास मदत मिळणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना राजू भालेकर करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांनादेखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहे.

You might also like
Loading...