पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदी हा मागील अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. टी२० विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केल्यानंतर तो सध्या बांगलादेश विरुद्ध सुरु असलेल्या टी२० मालिकेत खेळत आहे. मात्र, मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात केलेल्या एका गंभीर चुकीमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निशाण्यावर आला असून, त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कशी घडली होती घटना
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी२० सामना ढाका येथे खेळला गेला. पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली. मात्र, शाहीन याने केलेल्या एका चुकीमुळे सामन्याला गालबोट लागले.
तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अफिफ हुसेन याने उत्तुंग षटकार खेचला. त्यामुळे गोलंदाज शाहीन चांगलाच संतापला. पुढील चेंडू हुसेन याने सांभाळून खेळला आणि तो चेंडू शाहीनच्या हातात गेला. त्यावेळी त्याने तो चेंडू उचलून थेट हुसेनच्या पायावर फेकला. त्यामुळे हुसेन वेदनेने विव्हळू लागला. झाल्या प्रकाराबद्दल शाहीन आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांनी माफी मागितली.
आयसीसीने केली कारवाई
शाहीन याने केलेल्या या कृत्याबद्दल आयसीसीच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली. त्याला आयसीसीच्या २.९ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी समज देण्यात आली. हे त्याचे पहिलेच कृत्य असल्याने त्याला केवळ समज देण्यात आली. त्याने पुन्हा असे केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याच मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा वरिष्ठ वेगवान गोलंदाज हसन अली याने बेशिस्त वागणूक केल्यामुळे त्याच्यावर देखील कारवाई केली गेली होती.
विश्वचषकात केली उत्कृष्ट कामगिरी
शाहीन याने नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषकामध्ये शानदार कामगिरी करून दाखवली होती. भारताविरुद्ध त्याने तीन बळी मिळवत संघाला विश्वचषक इतिहासातील भारतीय संघाविरुद्ध पहिला विजय मिळवून दिला होता. त्याने विश्वचषकात एकूण ९ बळी मिळवले होते.