भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील सुपर-4 मधील सामना 5 विकेट्सने गमावला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 7 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.5 षटकात 5 विकेट्स शिल्लक असताना सामना जिंकला. भारताच्या या पराभवास वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला सर्वात जबाबदार धरले जात आहे. त्याने मोक्याच्या क्षणी झेल सोडल्याने भारतीय संघाला सामन्यात मागे जावे लागले. याच कारणाने चाहते सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. आता त्याच्या समर्थनार्थ थेट भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा आला आहे.
अर्शदीपने (Arshdeep Singh) या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली (Asif Ali Catch) याचा सोपा आणि महत्त्वपूर्ण झेल सोडला. त्याचमुळे त्याला भारताच्या पराभवाचे खलनायक ठरवले जात आहे. पाकिस्तानच्या डावातील अठराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आसिफने साधारण फटका मारला होता. यावेळी क्षेत्ररक्षक अर्शदीपकडे तो झेल टिपत आसिफला शून्य धावेवर परत पाठवण्याची संधी होती. परंतु अर्शदीपच्या हातून तो सोपा झेल सुटला. त्यानंतर आसिफने 8 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या, ज्या पाकिस्तानच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या. याच कारणामुळे अर्शदीपवर टीका होत आहे.
काहींनी अर्शदीपला शिव्या दिल्या तर काहींनी त्याला चक्क देशद्रोही म्हटले. या सर्व प्रकरणावर बोलताना भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने देखील मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“आता अर्शदीप ज्या प्रकाराला सामोरा जात आहे, त्या स्थितीतून मी देखील गेलो आहे. मात्र, मी त्याला घाबरलो नाही कारण माझा देश माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे होता. माझे त्याला इतकेच सांगणे आहे की, या प्रकरणाने तणावात येऊ नको. कारण तू एक अतिशय कर्तुत्ववान आणि प्रतिभावान खेळाडू आहेस.
मागील वर्षी टी20 विश्वचषकात शमी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चांगलाच महागडा ठरला होता. त्यावेळी त्याच्यावर देखील अशाच प्रकारचे आरोप केले गेले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेमिमाला ‘बर्थ डे’ गिफ्ट! वुमेन्स आयपीएलमध्ये खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
शिक्षक दिन | योग्य मार्गदर्शनामुळे ‘या’ दिग्गजांनी केले देशाचे नाव, खास पोस्ट करून दिल्या शुभेच्छा
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा संपूर्ण कार्यक्रम झाला जाहीर; या शहरांत होणार सामने