इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे. या अंतिम टप्प्यासाठी पात्र न ठरलेल्या संघांतील खेळाडूंनी व प्रशिक्षकांनी यानंतर होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी आपापल्या देशांच्या संघात सामील होण्यास सुरूवात केली असून, स्पर्धेच्या बायो-बबलमध्ये ते सहभागी झाले आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या न्यूझीलंडच्या शेन बॉन्डने देखील न्यूझीलंडचा राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा आपल्याकडे घेतली आहे. विशेष म्हणजे तो यावेळी नव्या भूमिकेत दिसून येईल.
बॉन्ड दिसणार नव्या भूमिकेत
आपल्या काळातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेला बॉन्ड मागील काही वर्षांपासून मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर तो न्यूझीलंड संघात समाविष्ट झाला असून, यावेळी तो चक्क फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसेल. न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी बॉन्डच्या या भूमिकेविषयी सांगताना म्हटले,
“बॉन्ड केवळ फिरकी गोलंदाजांसोबत काम करत आहे. आयपीएलमधील त्याचा दर्जेदार फिरकीपटूसोबतचा अनुभव संघाला फायदेशीर ठरू शकतो.”
सध्या संघाचा मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेनसन असून, बॉन्ड त्याला सहाय्य करेल. स्टीड यांनी यावेळी कर्णधार केन विलियम्सनच्या दुखापती विषयी माहिती देताना सांगितले की, तो पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी संघात सामील होईल. केन आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादच्या अखेरच्या साखळी सामन्यात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता. त्यामुळे तो विश्वचषकातील किती सामने खेळणार याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, तो केवळ सराव सामन्यांना मुकू शकतो.
विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ-
केन विलियम्सन (कर्णधार), टॉड ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, कायले जेमिसन, डॅरेल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, टिम सायफर्ट, ईश सोधी, टिम साउदी, ऍडम मिल्ने.