fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जेव्हा टीममधील एकट्या खेळाडूने कुटल्या होत्या १६० धावा, बाकी सगळे झाले शुन्यावर बाद

दक्षिण आफ्रिका येथे  2016 साली 19 वर्षांखालील महिलांचा एक टी20 सामना झाला होता. या सामन्यात एक अविश्वसनीय विक्रम घडला. एका फलंदाजाचे संपूर्ण सामन्यात वर्चस्व कसे राखले हे पहिल्यांदाच पाहता आले. एमपुमालंगाच्या 19 वर्षांची शानिया-ली स्वार्टने प्रिटोरिया येथे झालेल्या सामन्यात 160 धावांची जबरदस्त खेळी केली. आश्चर्यचकित करणारी एक बाब म्हणजे संघातील उर्वरित सर्वच खेळाडूंना भोपळा देखील फोडता आला नाही.

ईस्टर्न्स आणि एमपुमालंगा या दोन्ही संघात सामना सुरू होता. सामन्यात एमपुमालंगा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अवघ्या 19 धावांवर 3 गडी बाद झाले. त्यानंतर स्वार्टने सामन्याची सर्व सूत्रे हाती घेत चौथ्या विकेटसाठी योनेला वेलेलो बरोबर अर्धशतकीय भागीदारी केली. ज्यात वेलेलोने शून्य धावांचे योगदान दिले. नवव्या विकेटसाठी स्वार्टने निकोलेट फिरी हिच्यासोबत 61 धावांची भागीदारी केली. अखेर एमपुमालंगा संघाने  20 षटकात 8 बाद 169 धावांपर्यंत मजल मारली. यातील 160 स्वार्टच्या बॅटमधून आल्या होत्या. इतर 9 धावा या अतिरिक्त मधून आलेल्या होत्या.

स्वार्टने आपल्या या शानदार खेळीत 86 चेंडूंचा सामना करत 160 धावा कुटल्या. यात 18 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. 160 धावांमधील 144 धावा केवळ चौकार आणि षटकारांमधून आल्या होत्या. स्वार्टने या सामन्यात गोलंदाजी करताना 21 धावा देत 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले आणि आपल्या संघाला 41 धावांनी विजय मिळवून दिला.

Photo Courtesy: ESPNCricinfo

संपूर्ण सामन्यात स्वार्टचा दबदबा होता.  तिने 160 धावांची ऐतिहासिक खेळी करत इतिहास घडवला. तसेच या सामन्यात तिने आठ फलंदाजाला बाद होताना पाहिले आहे. त्यानंतर तिने एका वनडे सामन्यात 289 धावा काढल्या होत्या आणि तेव्हा संघाच्या संपूर्ण धावांची संख्या 352  होती.

You might also like